विट्यात भाजी विक्रेते व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांवर दादागिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:27 AM2021-04-27T04:27:23+5:302021-04-27T04:27:23+5:30
फोटो - २६०४२०२१-विटा-भाजी मंडई ०२ व ०३ : विटा येथील भाजी मंडईतील व्यापाऱ्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा भाजीपाला सोमवारी टेम्पोत ...
फोटो - २६०४२०२१-विटा-भाजी मंडई ०२ व ०३ : विटा येथील भाजी मंडईतील व्यापाऱ्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा भाजीपाला सोमवारी टेम्पोत भिरकावून देत शेतकऱ्यांना हुसकावून लावले.
दिलीप मोहिते
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा येथे शेती माल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना भाजी मंडई परिसरातून हुसकून लावण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून व्यापाऱ्यांकडून सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पाले-भाज्यासह अन्य शेती माल फेकून देत त्यांच्यावर मंडईतील स्थानिक व्यापाऱ्यांनी दादागिरी सुरू केली आहे. याकडे नगरपालिका प्रशासन व सत्ताधारी मंडळींनी केवळ बघ्यांची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
विटा येथील मायणी रस्त्यावर नवीन आठवडा बाजार भाजी मंडई आहे. सोमवारी शेतकरी सकाळी ७ वाजता भाजी मंडई परिसरातील रस्त्यावर आपली भाजी विक्रीसाठी घेऊन बसले होते. त्यावेळी मंडईतील भाजी विक्रेत्यांनी त्यांना येथे बसायचे नाही, तुम्हाला कोणी परवानगी दिली, असे म्हणत शेतकऱ्यांसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेती मालाचे कॅरेट उचलून टेम्पोमध्ये फेकून मालाचे नुकसान केले. तर काहींनी त्यांना मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. या घटनेनंतर उगीच वाद नको यासाठी ग्रामीण भागातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला शेती माल घेऊन घरचा रस्ता धरला.
चाैकट
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे
सध्या लॉकडाऊनमुळे सकाळी ११ वाजेपर्यंत भाजी मंडई सुरू असते. शेतकरी त्यांच्या शेतात पिकविलेला भाजीपाला विक्रीसाठी आणल्यानंतर शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत असल्याचे दिसून येते. परंतु, भाजी मंडईत व्यापाऱ्यांकडूनच सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडत आहे. हा सर्व प्रकार माहिती असून पालिका प्रशासन व सत्ताधारी मंडळी बघ्यांची भूमिका घेत आहेत. यात आता जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.