सांगली । जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान होणार असून, जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. २0१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलताना मोठी उलथापालथ झाली होती. त्यामुळे महायुती आणि महाआघाडीसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. बहुतांश मतदारसंघात तुल्यबळ उमेदवारांमुळे लढती चुरशीच्या ठरल्या आहेत. प्रचाराची रणधुमाळी शांत झाल्यानंतर आता प्रत्यक्ष मतदानाची वेळ आल्याने उमेदवार, त्यांचे समर्थक व राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अपेक्षित कौल मिळावा म्हणून देव पाण्यात ठेवले आहेत. दुसरीकडे प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रयत्न चालविले आहेत.कडेकोट बंदोबस्त२,५०० स्थानिक पोलीस, ३००0 होमगार्डस्, केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या, कोल्हापूर, कर्नाटक तसेच अतिरिक्त पोलीस बळ मदतीला, रात्रंदिवस गस्त, आकस्मिक नाकेबंदी, सर्वच आठ मतदारसंघांत कडेकोट बंदोबस्त.कुठे काही गडबड झाली तर काय?शहरातील कोणत्याही भागात मतदानाच्यावेळी कसलीही गडबड झाली किंवा कुठे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर, अवघ्या ५ ते ७ मिनिटात शीघ्र कृती दल (क्यूआरटी) तेथे पोहोचेल. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सीआयएसएफ आणि एसआरपीएफची कंपनी तात्काळ धाव घेईल आणि स्थिती निर्माण करणाऱ्यावर कडक कारवाई करेल. सोमवारी सकाळपासून मतदान संपेपर्यंत पोलीसप्रमुख ते पोलीस कर्मचारी असे सर्वच बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत.मतदारांसाठी ३५३0 व्हीव्हीपॅटविधानसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी ३ हजार ५३0 व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. मतदान केल्यानंतर सात सेकंदामध्ये मतदाराला पावती मिळेल. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य आहे.ईव्हीएम बिघडल्यास काय आहे व्यवस्था?ईव्हीएम मशीन बिघडण्याची शक्यता लक्षात घेता आधीपासूनच अतिरिक्त मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. बिघाड झाल्यास त्याठिकाणी अतिरिक्त मशीन बसविण्यात येईल. मतदान प्रक्रियेसाठी एकूण बॅलेट युनिट ४ हजार ५४0, सेंट्रल युनिट ३ हजार २७0 ठेवण्यात आली आहेत.मतदानासाठी ‘सुटी’ जाहीर झाली का?सर्व आस्थापना सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळात बंद ठेवण्यात येतील. त्या दिवशी बंद राहिलेली दुकाने, आस्थापनामधील कर्मचाºयांच्या पगाराची कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही, असे अप्पर कामगार आयुक्त यांनी कळविले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी आदींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
मतदारराजा आज देणार महाकौल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 11:27 PM