कवठेमहांकाळ : राज्यातील तसेच जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार गत तीन वर्षापासून ट्रेनिंग लेटरच्या प्रतीक्षेत आहेत. आमचे खाकी वर्दीचे स्वप्न हे शासन कधी पूर्ण करणार, असा प्रश्न या तरुणांपुढे निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र शासनाने २०१७-१८ या वर्षात एमपीएससीअंतर्गत घेतलेल्या परीक्षेत राज्यातील एकूण ४१५ जण उत्तीर्ण झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील २१ व कवठेमहांकाळ तालुक्यातील चार जणांचा यात सामावेश आहे. गेली साडेतीन वर्षे झाली हे भावी अधिकारी खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून बसले आहेत. त्यांच्या कुटुंबाने पोटाला चिमटा काढत या तरुणांना शिकवले. आता आपले स्वप्न पूर्ण होणार म्हणून हे तरुण ट्रेनिंगच्या तयारीत गुंतले. त्यांच्या जन्मगावी मित्रमंडळींनी जल्लोषी मिरवणुका काढल्या.
परंतु या सर्व गोष्टींना साडेतीन वर्षे झाली. आता हे उमेदवार मानसिक तणावाखाली गेले आहेत. एवढी मेहनत, कष्ट करून प्रतीक्षा कशासाठी, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
कोरोनामुळे ट्रेनिंगला बोलवण्यात आले नसल्याचे लेखी पत्र राज्याच्या पोलीस महासंचालकांनी काढले आहे. परंतु दोन वर्षापूर्वी कोरोना नव्हता, असे या तरुणांचे मत आहे. राज्य सरकारने त्वरित ट्रेनिंग लेटर सुरू करून आमची प्रतीक्षा संपवावी, अशी मागणी या तरुणांनी केली आहे. राज्य सरकार या भावी पोलीस अधिकाऱ्यांचे कष्टाने साकार केलेले खाकीचे स्वप्न लवकर पूर्ण करणार, की अजून किती वर्षे त्यांना ताटकळत ठेवणार, असा संतप्त सवाल आता या तरुणांनी शासनाला विचारला आहे.