शिराळा : वाकुर्डे योजना पूर्ण ताकद लावून पूर्ण करणार आहे. विरोधकांना पुढील निवडणुकीत या योजनेवर बोलण्याची संधी देणार नाही, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.शिराळा येथील मरिआई चौकात नागरी सत्कार तसेच फत्तेसिंगराव नाईक कृषी प्रदर्शन, उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आमदार मानसिंगराव नाईक, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार बाबासाहेब पाटील, सुनीतादेवी नाईक, अश्विनी नाईक, सुरेश चव्हाण, अॅड. भगतसिंग नाईक, अमरसिंह नाईक, राजेंद्र नाईक, सम्राटसिंह नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.जयंत पाटील म्हणाले, वाकुर्डे योजनेचे काम पूर्ण करून फत्तेसिंगराव नाईक यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच या खात्याचे मंत्रीपद मला मिळाले आहे. त्यामुळे ही योजना पूर्ण करण्यासाठी जेवढा निधी लागेल तो देऊ. पाच वर्षांत ही योजना पूर्ण करणार आहे. त्यामुळे विरोधकांना आता वेगळा विषय निवडावा लागेल.
शिराळा नगरपंचायत तसेच राज्यातील नवीन नगरपंचायत ना शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यासाठी आपण खास बैठक बोलावणार आहे. शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचा आदर्श घेऊन सर्व ठिकाणी अद्ययावत इमारत बांधून चांगली आरोग्य सेवा द्यावी. आमदार मानसिंगराव यांनी या मतदारसंघाचा २००९ ते २०१४ दरम्यान विकास करुन एक आदर्श निर्माण केला आहे.आमदार नाईक म्हणाले, तहसीलदार कार्यालय, शिराळा बसस्थानक, पंचायत समिती इमारत, उपजिल्हा रुग्णालय आदी ५१५ कोटींची विकास कामे २००९-१४ मध्ये झाली. येथे चांगली आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न असतील. वाकुर्डे योजना पूर्ण करण्यासाठी यावर्षी ५० कोटी व पुढीलवर्षी ११० कोटी रुपयांचा निधी मिळावा.खासदार धैर्यशील माने म्हणाले, नागपंचमी व बैलगाडी शर्यतीसाठी आपण दिल्लीमध्ये पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहोत. राज्य सरकारनेही यासाठी मदत करावी.
विजयराव नलवडे यांनी स्वागत केले. याप्रसंगी दिनकर पाटील, नगराध्यक्षा अर्चना शेटे, सुनंदा सोनटक्के, प्रमोद नाईक, देवेंद्र पाटील, कीर्तीकुमार पाटील, मंजुषा पाटील, छायाताई पाटील, वैशाली माने, बाळासाहेब नायकवडी, विवेक नाईक, राम पाटील, भूषण नाईक, रोहित नाईक, विश्वप्रताप नाईक, पल्लवी पाचपुते, रंजना नाईक, शुभलक्ष्मी नाईक, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, बाबासाहेब पवार उपस्थित होते.