पेट्री/ सातारा : सातारा शहराच्या पश्चिमेस कास परिसरात ढोल, खर्डीक, थाळयांच्या तालावर पारंपारिक पध्दतीने गवत कापणी करण्यात शेतकरी वर्ग व्यस्त झाला आहे. ढोलांच्या तालावर गवतावर विळा चालत असल्याचे चित्र या भागात पाहावयास मिळत आहे.पावसाळ्यात गुरांना चारा उपलब्ध करता यावा या हेतूने कास परिसरातील शेतकरी गवत कापणी करू लागले आहेत. हे कष्टाचे काम हसत खेळत व्हावे, या कामात वेग यावा यासाठी शेतकरी ढोल वाजवत मनोरंजन करत गवत कापणी करत आहेत.
हा भाग दाट झाडीझुडपे, जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा वावर या भागात जास्त आहे. पाळीव जनावरांसाठी डोंगर पठारावर वाढलेले गवत कापताना वन्यप्राण्यांकडून हल्ले होण्याचा धोका संभवण्याची शक्यता असल्यामुळे तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांचा उपद्र्रव होऊ नये यासाठी शेतकरी वाद्ये वाजवत गवत कापणी करतात.कास परिसरातील कुसुंबीमुरा, ता. जावळी या भागात सध्या गवत कापणीस वेग आला आहे. वाडी-वस्तीवरील शेतकरी कुटुंबे एकत्र येऊन एकमेकांच्या सहकार्याने ढोल-ताशाच्या गजरात गवत कापणीचे काम करत आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात वाद्यांचा आवाज घुमू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
उन्हाळ्यात डोंगरमाथ्यावर चाऱ्याची प्रचंड टंचाई असता खडकाळ जमिनीमुळे पावसाचे पाणी वाहून जाते. परिणामी पावसाळ्यात उगवलेला चारा जास्त काळ टिकून राहत नाही. या भागातील शेतकरी दरवर्षी डोंगरमाथा, पठारावर पावसाळ्यात वाढलेले गवत कापतात. उन्हाळ्यात याच चाऱ्यावर जनावरांचे पोषण होत असते.कास परिसरात गवत कापणीच्या कामास इरजिक किंवा कामगात बोलले जाते. गवत कापणीच्या कामात एकमेकांना मदत करणे याला पैरा म्हणतात. काही वेळा पैशाच्या मोबदल्यात ही कामे करवून घेतली जातात. ज्यांच्याकडे गवत कापणीच्या कामास जायचे त्यांच्याकडून सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. दुपारी सर्वजण शेताच्या कडेला सावलीला बसुन सहभोजनाचा आनंद घेतानाही पाहायला मिळत आहेत.
यंदा चाऱ्याचे प्रमाण पुष्कळ असून, साधारण दोन-तीन आठवडे गवत कापणीचे काम सुरू राहील. हे काम बहुतांशी रोजंदारीवर पूर्ण केले जाते. संगिताच्या तालावर गवत कापणी करणे याला या परिसरात सौंदा म्हणतात.- चंदर गोरे,शेतकरी, कुसुंबीमुरा