मांजर्डे : तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळी झळा तीव्र झाल्या आहेत. यामुळे परिसराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. यामुळे तासगाव पूर्व भागातील शेतीला वरदान ठरणारी विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने चालवून कापूर ओढा व या भागातील लोंढे, पेड, बलगवडे हे तलाव भरून घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
तासगाव पूर्व भागातील द्राक्षबागांची खरड छाटणी अंतिम टप्प्यात आली आहे. आता या भागातील शेतीला पाण्याची गरज आहे. त्यामुळे या योजनेचे पाणी सोडून या भागातील तलाव भरून घेतले तर या पाण्याचा नक्कीच लाभ होईल अशी आशा आहे.
तासगाव पूर्व भागाला वरदान ठरणारा तालुक्यातील सर्वांत मोठा मध्यम प्रकल्प म्हणून सिद्धेवाडी तलाव गणला जातो. ३०२.९५ एमटीएफसी इतकी पाणी साठवण असलेल्या या तलावात सद्य:स्थितीला ६४ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच त्यापाठोपाठ लोढे तलावाची क्षमता १६८ एमसीएफटी आहे. या तलावामध्ये सध्या ७० टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
सध्या वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे परिसरातील पाणी पातळी कमालीची घटत असून विहिरी, तलाव, कूपनलिका, ओढे-नाले पूर्णतः कोरडे ठाक पडले आहेत. द्राक्ष काढणी झाल्यानंतर वेलीला प्रचंड ताण पडला असल्याने खरड छाटणीवेळी या वेलीला फुटवे फुटण्यासाठी मुबलक पाण्याची आवश्यकता असते. तरच ती द्राक्षकाडी परिपक्व होऊन त्यात गर्भधारणा होते व ऑक्टोबरमध्ये फळ छाटणीनंतर त्यातून द्राक्ष घड बाहेर पडतात; पण ऐन मोक्याच्या कालावधीतच कडक ऊन व पाण्याची वानवा यामुळे ही काडी परिपक्व करताना द्राक्ष बागायतदारांची कसोटी लागते. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरून प्रशासनाला सहकार्य केले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष घालून पाणी वितरण वेळेत करावे ही मागणी जोर धरू लागली आहे.