फोटो २४ संतोष ०५ सांगली - कोल्हापूर रस्त्यावरील वसाहतींत असे पाणी शिरले होते.
फोटो २४ संतोष ०६ राजवाडा चौक ते एसएफसी मॉलदरम्यान अशी स्थिती होती
फोटो २४ संतोष ०७ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पाण्याने वेढले होते.
फोटो २४ संतोष ०८ महापालिका आयुक्तांचा बंगला पूर्णत: पाण्यात होता.
फोटो २४ संतोष ०९ प्राइड मल्टिप्लेक्सभोवती नजर जाईल तेथपर्यंत पाणी पसरले होते.
फोटो २४ संतोष १० शामराव नगरमध्ये अनेक बंगल्यांत पाणी शिरले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शनिवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली तरी कृष्णेने मात्र माघार घेतली नाही. सायंकाळी सात वाजेपर्यंत आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी ५२.४ फुटांवर गेली होती. दिवसभरात पुराचे पाणी शहरात स्टेशन चौकापर्यंत घुसले होते. विस्तारित भागासह बहुतांश परिसर पाण्याखाली गेला होता.
शहरात सकाळी टिळक चौकात पाणी आल्यानंतर इस्लामपूरशी सांगली शहराचा संपर्क तुटला. दुपारनंतर कोल्हापूर रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूकही बंद झाली. शामराव नगरला पाण्याने विळखा घातला आहे. खिलारे कार्यालय, गजराज कॉलनी, वरद कॉलनी, गजानन नगर, अष्टविनायक नगर, सिद्धिविनायक नगर या परिसरात रस्त्यांवर अडीच फूट पाणी होते. अनेक घरे, दुकानांत पाणी शिरले आहे. पुराच्या अंदाजाने रहिवाशांनी शुक्रवारपासूनच घरे रिकामी केली आहेत. घरांच्या सुरक्षेसाठी काही तरुण थांबून आहेत. सांगलीवाडीत सखल भाग पाण्याखाली गेला आहे. बहुतांश गल्ल्यांत पाणी शिरले आहे. शनिवारी दुपारी तेथे रबरी बोटी पाठवण्यात आल्या. शहरात गावभाग, मारुती चौक, शिवाजी पुतळा, शिवाजी मंडई, टिळक चौक, हरभट रस्ता हा भाग शुक्रवारपासूनच पाण्याखाली गेला आहे. टिळक चौकातून गणपती मंदिराच्या दिशेने पाणी पसरत आहे. बसस्थानकाजवळील शाहू उद्यान, फौजदार गल्ली, रिसाला रस्त्यावरही शनिवारी संध्याकाळपर्यंत पाणी पोहोचले. सांगली हायस्कूल, वखारभाग, इंद्रप्रस्थनगर, आयुक्त बंगला परिसरात पाणी पसरले आहे. आयुक्तांचा बंगला पाण्याने पूर्णत: वेढला गेला आहे.
शहरात पाणी शिरू लागल्याने काही मार्गांवरील वाहतूक पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केली. एरवी भरधाव वाहनांमुळे गजबजलेल्या रस्त्यांवर रबरी होड्या फिरताना सांगलीकरांनी पाहिल्या. बायपास रस्ता, ईदगाह मैदान, स्टेशन रस्ता, भारतनगर, मीरा हौसिंग सोसायटी येथेही पाणी पसरले आहे. राजवाडा चौकापासून एसएफसी मॉलपर्यंतच्या रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते.
चौकट
आयुक्तांच्या बंगल्याला बेटाचे स्वरूप
महापालिका आयुक्तांच्या बंगल्याला बेटाचे स्वरूप आले आहे. संपूर्ण परिसर पाण्याने वेढला आहे. प्राइड मल्टिप्लेक्समार्गे बायपासकडे वाहतूक बंद आहे. पुराचे पाणी बंगल्यात शिरले आहे.
चौकट
इस्लामपूरशी संपर्क तुटला
बायपास व आयर्विन पुलावरील वाहतूक बंद झाल्याने शनिवारी सांगलीचा इस्लामपूरसह पश्चिमेकडील सर्व गावांशी संपर्क तुटला. आयर्विन पुलाजवळील टिळक चौक व बायपास रस्त्यावरील शिवशंभो चौकात पाणी वाढल्याने वाहतूक बंद झाली.