विटा : कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने त्याचा फटका यंत्रमाग व्यवसायाला बसला आहे. रोजगार निर्मितीचे केंद्र असलेला यंत्रमाग व्यवसाय नऊ दिवसांपासून पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याने विटा येथे प्रतिदिन एक कोटी रुपयांच्या कापड उत्पादनावर पाणी पडले आहे. परिणामी, यंत्रमागावर काम करणाऱ्या सुमारे दोन हजार कामगारांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. यंत्रमागधारकांसह कामगारांनीही घरीच थांबण्याचा निर्णय घेतला आहे.
सांगली जिल्'ातील विटा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून यंत्रमाग व्यवसाय कार्यरत आहे. कोरोनाच्या संकटामुळे देशभर लॉकडाऊन करण्यात आल्याने, शेतीपाठोपाठ मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणारा हा यंत्रमाग व्यवसाय दि. २२ मार्चपासून पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कापड उत्पादन ठप्प झाले आहे. यंत्रमागावर काम करणारे यंत्रमाग कामगार, वहीफणी, घडीवाले, जॉबर, कांडीवाले, त्याचबरोबर बिगारी असे सुमारे १ हजार ८०० ते २ हजार कामगार आपापल्या घरी गेले आहेत.विटा शहरात सध्या पाच हजार यंत्रमागांची संख्या आहे.
या यंत्रमागांवर प्रतिदिन चार लाख मीटर कापड उत्पादन होते. परंतु, लॉकडाऊनमुळे यंत्रमाग व्यवसाय ठप्प झाला आहे. परिणामी, दररोज एक कोटी रुपयांचे कापड उत्पादन बुडाले आहे. कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी, तसेच कामगारांचे जीवन सुखकर होण्यासाठी यंत्रमागधारकांनी कारखाने पूर्णपणे बंद ठेवून प्रसंगी नुकसान सोसण्याची तयारी केली आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये विटा शहरातील यंत्रमागधारकही सहभागी झाले आहेत. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रसंगी नुकसान सोसून शहरातील सर्व यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी सांगितले.