महापालिकेत हिशेबाची चर्चा
महापालिका स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे यांचा स्वभाव तसा शांत, संयमी. कुणाला दुखवायचे नाही, मग तो सत्ताधारी असो की विरोधक. त्यामुळेच त्यांच्या सभापती कारकिर्दीत अजून तरी संघर्ष करावा लागला नाही. सकाळी मिरजेतल्या आमदारांच्या कार्यालयात हजेरी, सांगली कार्यालयाकडे येताना विश्रामबागला आमदार सुधीर गाडगीळांच्या कार्यालयात थांबा ठरलेला. दोन्ही आमदारांकडे हजेरी लावून दुपारनंतर त्यांचे महापालिकेत आगमन होते. तसे त्यांच्या हाती मनपाची तिजोरी असल्याने नगरसेवक, ठेकेदारासह प्रत्येकजण त्यांची वाट पाहत असतात. आता त्यांच्या सभापती पदाचा कार्यकाल दोन महिने उरला आहे. स्थायीचे सदस्य तर त्यांच्या कार्यालयात ठाण मांडून असतात. कुणी म्हणते सदस्य हिशेबासाठी थांबले तर कुणी कामासाठी आल्याचे सांगतात. पण हिशेबाची चर्चा अधिक आहे. सदस्य कसला हिशेब मागत आहेत हे सभापती, सदस्यांनाच माहीत?