अशोक पाटील इस्लामपूर : महायुतीचा फॉर्म्युला ठरण्याअगोदरच इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघात उमेदवारीसाठी पाच नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. भाजपची गोपनीयता शिगेला पोहोचली आहे,तर इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेला कधी जातो आणि आपल्याला उमेदवारी कधी मिळते, याची प्रतीक्षा जिल्हाप्रमुखांना लागून राहिली आहे.इस्लामपूर मतदार संघात भाजपकडून नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ताकद पणाला लावली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावली आहे. निशिकांत पाटील यांनी ग्रामीण भागात लक्ष केंद्रित केले आहे.
दुसरीकडे हुतात्मा संकुलाचे गौरव नायकवडी यांच्या समर्थकांनी भाजपच्या उमेदवारीसाठी मुंबई येथे ठाण मांडले आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी, कोणत्याही परिस्थितीत आपणास उमेदवारी देऊ, असा शब्द दिल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नायकवडी यांनी इस्लामपूर, आष्टा शहरात लक्ष केंद्रित केले आहे. आता भाजपकडून ए फॉर्म या दोघांपैकी कोणाला मिळतोय, याकडे लक्ष लागून राहिले आहे.महायुतीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे मित्रपक्षाला काही जागा सोडण्यात आल्या आहेत. इस्लामपूर मतदारसंघ रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत जे नाव सुचवतील, त्यांना उमेदवारी देण्यात येईल, असेही सांगितले जात आहे. त्यामध्ये गौरव नायकवडी यांचे नाव आघाडीवर आहे. अशीच परिस्थिती शिराळा मतदार संघात आहे.
काँग्रेसमधून सत्यजित देशमुख भाजपमध्ये दाखल झाले. आता उमेदवारी विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक की देशमुख यांना असा प्रश्न आहे. या निर्णयात महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक अडसर ठरत आहेत. महाडिक यांनी यावेळची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तेथे उमेदवारी कोणाला मिळणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.