गणपती पेठेतील होलसेल दुकाने आजपासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:28 AM2021-05-19T04:28:12+5:302021-05-19T04:28:12+5:30
सांगली : जिल्हा प्रशासनाने कोरोना नियमांचे पालन करून मार्केट यार्डातील किराणा मालांची होलसेल दुकाने बुधवारपासून सुरू करण्यास परवानगी दिली ...
सांगली : जिल्हा प्रशासनाने कोरोना नियमांचे पालन करून मार्केट यार्डातील किराणा मालांची होलसेल दुकाने बुधवारपासून सुरू करण्यास परवानगी दिली होती. पण याचवेळी गणपती पेठेतील होलसेल दुकानांना मात्र परवानगी नव्हती. ही बाब पालकमंत्री जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर गणपती पेठेतील होलसेल दुकाने आजपासून सुरू करण्यास परवानगी दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते शेखर माने यांनी दिली.
जिल्ह्यातील लाॅकडाऊन आणखी सात दिवस वाढविण्यात आला आहे. पण लाॅकडाऊन वाढविताना प्रशासनाने मार्केट यार्डातील दुकाने किरकोळ विक्रेत्यांसाठी सकाळी ७ ते ११ या वेळेत उघडण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे मार्केट यार्डात किराणा साहित्य खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातच गणपती पेठेत गूळ, साखर, नारळ, तेल, चहा आदी साहित्याची २२ हून अधिक होलसेल व्यापारी आहेत. या व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी, यासाठी शेखर माने यांनी पुढाकार घेतला.
माने म्हणाले की, गणपती पेठेतील होलसेल व्यापारी आहेत. त्यांची दुकाने सुरू करण्याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. मंत्री पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनीही गणपती पेठेतील दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील गर्दी बऱ्यापैकी कमी होईल. याबाबत सायंकाळी पोलीस प्रशासन व व्यापाऱ्यांचीही बैठक झाली. यात कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.