सांगली : महापालिका क्षेत्रातील व्यवसायधारकांनी व्यवसाय परवाना शिबिरास प्रतिसाद दिला असून, आतापर्यंत चार हजार व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे. यातून महापालिकेला ६० लाख २० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. आता व्यावसायिकांचे सर्वेक्षण करून उर्वरितांना परवाना दिला जाईल. प्रसंगी त्यांच्या घरपट्टीतून परवाना शुल्काची रक्कम वसूल केली जाईल, असा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला.
आयुक्त कापडणीस म्हणाले की, महापालिका क्षेत्रात व्यावसायिकांना परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. व्यवसाय नोंदणीसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांच्या पथकाने या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. यामध्ये मागील आर्थिक वर्षात ४ हजारांहून अधिक व्यवसायधारकांनी महापालिकेचा व्यवसाय परवाना घेतला आहे. यातून मार्चअखेर महापालिकेला व्यवसाय परवाना आणि नूतनीकरण यांच्या माध्यमातून ६० लाख २० हजारांचे उच्चांकी उत्पन्न प्राप्त झाले आहे. अजूनही ज्या व्यवसायधारकांनी परवाने काढले नाहीत, त्यांनी तत्काळ काढून घ्यावेत, असे आवाहनही आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.