शिराळ्यात भर पावसात महिलांचा मोर्चा
By admin | Published: July 18, 2014 11:50 PM2014-07-18T23:50:51+5:302014-07-18T23:58:32+5:30
नागपंचमीचा वाद : जिवंत नागाची पूजा करण्यास मान्यतेची मागणी; सलग तिसऱ्या दिवशीही बंद
शिराळा : ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं’, ‘आम्हाला जिवंत नागाची पूजा करण्यास परवानगी द्या’ अशा घोषणा देत शेकडो शिराळकर महिलांनी आज, शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. नागपंचमी सुरू राहण्यासाठी परवानगी मिळावी, या आशयाचे निवेदन तहसीलदारांना दिले. या मोर्चात पावसात भिजत कडेवर लहान मुले घेतलेल्या व वृद्ध महिलांचाही मोठा सहभाग होता. शिराळा शहरात आज तिसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला.
उच्च न्यायालयाने जिवंत नाग पकडणे, पूजा करणे यावर बंदी घातल्याने बुधवार दि. १६ पासून शिराळा शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. आज दुपारी बाराच्यादरम्यान शेकडो महिलांनी ग्रामदैवत श्री अंबामाता मंदिरापासून घोषणा देत सोमवार पेठ, कुरणे गल्ली, गुरुवार पेठ, पूल गल्ली, एसटी बसस्थानक या मार्गावरून मोर्चा काढला. मोर्चा तहसील कार्यालय येथे आल्यावर नायब तहसीलदार समीर यादव यांना निवेदन दिले.
निवेदन देताना सौ. श्वेता नलवडे यांनी सांगितले की, नाग हा आमचा भाऊ आहे. त्याची पूजा करणे हा आमचा हक्क आहे. आम्ही नागपंचमीदिवशी उपवास करतो. तो उपवास जिवंत नागाची पूजा व दर्शन केल्यावरच सोडतो. त्यामुळे यावर्षी जर नागपूजा करता आली नाही, तर आम्ही उपवास सोडणार नाही. शिराळ्याच्या नागपंचमीमुळे निसर्ग दूषित होत असेल, तर आम्ही पर्यावरणवाद्यांना आव्हान देतो की, त्यांनी इतर संस्कृतीहीन घटना बंद करून दाखवाव्यात. या मोर्चामध्ये अनघा शिंदे, सविता नलवडे, संगीता साळुंखे, प्रा. प्रज्ञा काकडे, जयश्री कवठेकर, मनीषा नलवडे, जयश्री पाटील, नंदाताई कदम, स्मिता डांगे, माधुरी शिंदे, विद्या गायकवाड, सखुबाई शेणेकर यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चावेळी नागपंचमीची गीतेही महिलांनी म्हटली. आज तिसऱ्या दिवशीही शिराळकरांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला.
उद्या, दि. १९ रोजी ग्रामदैवत अंबामातेस ग्रामस्थांच्यावतीने महाअभिषेक घालण्यात येणार आहे. (वार्ताहर)
-मोर्चा निघाल्यापासून पाऊस पडत होता. मात्र या पावसाची जराही पर्वा न करता लहान मुलांना कडेवर घेतलेल्या महिला, वृद्ध महिला, युवती यांच्यासह तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. एवढा मोठा महिलांचा मोर्चा पहिल्यांदाच काढण्यात आला.
-मोर्चावेळी नागपंचमीची गीतेही महिलांनी म्हटली. आज तिसऱ्या दिवशीही शिराळकरांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला.