लोकमत न्यूज नेटवर्क
मांगले : कोरोना संकट काळात आपल्या जिवाची पर्वा न करता, अविरतपणे सेवा देणाऱ्या आशा सेविकांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे मत माजी सरपंच व युवा उद्योजक विजय पाटील यांनी व्यक्त केले.
मांगले (ता. शिराळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविकांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा श्री मंगलनाथ उद्योग समूहाच्यावतीने कोविड योद्धा सन्मानपत्र व संसारोपयोगी साहित्य देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विजय पाटील बोलत होते.
ते म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अहोरात्र विविध उपाययोजना राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर आशा सेविका जोखीम पत्करून गावागावात सर्वेक्षणाचे काम करत आहेत. कोरोना लसीकरण मोहिमेमध्येही आशांची कामगिरी उल्लेखनीय आहे.
यावेळी लोकनियुक्त सरपंच मीनाताई बेंद्रे, आरोग्य अधिकारी डॉ. जयसिंग पवार, डॉ. महम्मद फिरजादे, डॉ. सुमीत कांबळे, प्रा. भीमराव गराडे-पाटील, महादेव चौगुले, राहुल चरापले, प्रा. दीपक तडाखे, ज्ञानदेव शिंदे, विजय गराडे, राजेंद्र दिवाण, आदी उपस्थित होते. दत्तात्रय तडाखे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र गवळी यांनी आभार मानले.