दर पंधरवड्यात कामगारांची कोरोना चाचणी आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:27 AM2021-05-18T04:27:14+5:302021-05-18T04:27:14+5:30
सांगली : कारखान्यांतील सर्व कर्मचाऱ्यांची प्रत्येक १५ दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लॉकडाऊनमधून अत्यावश्यक, सलग ...
सांगली : कारखान्यांतील सर्व कर्मचाऱ्यांची प्रत्येक १५ दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लॉकडाऊनमधून अत्यावश्यक, सलग प्रक्रिया व निर्यातक्षम उद्योगांना काही अटी व शर्तींवर परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे अैाद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योग सुरू आहेत. कोरोनाची काळजी घेऊन कामकाज सुरू असले तरी तुरळक प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे प्रत्येक १५ दिवसांनी कामगारांची चाचणी करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. यासंदर्भात कुपवाड पोलीस ठाण्यातून उद्योगांना पत्रे जारी करण्यात आली आहेत. त्यानुसार पोलीस उद्योगांना भेटी देऊन कोरोनाविषयक तपासणी करणार असल्याचे म्हटले आहे. या आदेशाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.
या अनुषंगाने सांगली मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने सर्व उद्योजकांना आवाहन केले आहे की, त्यांनी सर्व कामगार व कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. सर्व पात्र कामगारांचे लसीकरण त्वरित करून घ्यावे.
कोरोनाबाधित कामगारांना त्वरित उपचार द्यावेत, तसेच संशयितांचे विलगीकरण करावे. कामगारांचे लसीकरण झाले असल्यास तसा अहवाल कारखान्यात उपलब्ध ठेवावा. लसीकरण झाले नसल्यास संबंधित कामगाराचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल ठेवावा.