यल्लमा चौक, गांधी चौक ओस
By admin | Published: October 7, 2014 11:28 PM2014-10-07T23:28:08+5:302014-10-07T23:40:35+5:30
इस्लामपुरातील चित्र : यंदा प्रचारसभाच नाहीत
अशोक पाटील-- इस्लामपूर -माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात ‘एकास एक’ उमेदवार देण्याचा विरोधकांचा प्रयत्न फसला आहे. त्यामुळे प्रचाराची हवा गरम होण्याऐवजी थंड झाली आहे. प्रत्येक निवडणुकीत इस्लामपूर शहरातील यल्लमा चौक, गांधी चौकातील प्रचार सभा गाजतात. यावेळी मात्र हे चौक अद्यापही शांतच आहेत.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याविरोधात बोरगावचे माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांचे चिन्ह मतदारांच्या परिचयाचे आहे. परंतु इतर अपक्षांची चिन्हे अद्यापही मतदारांपर्यंत पोहोचलेली नाहीत. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसविरोधात राजू शेट्टी यांचे निवडणूक चिन्ह असलेली ‘शिट्टी’ चांगलीच गाजली होती. याचा फायदा विधानसभा निवडणुकीत उठविण्यासाठी स्वाभिमानीचे बंडखोर उमेदवार बी. जी. पाटील यांनी शिट्टी हेच चिन्ह घेऊन प्रचाराला गती आणली आहे. जयंत पाटील यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्यासाठी राजू शेट्टी आग्रही होते. परंतु त्यांना यश आले नाही. स्वाभिमानीचे बंडखोर बी. जी. पाटील यांनी त्यांच्या प्रचार पत्रिकेवर शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांचे छायाचित्र वापरल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसच्या अभिजित पाटील यांनी शेट्टी यांना साथ दिली. हा पैरा फेडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना थेट उमेदवारी दिली नसली तरी पाठिंबा दिला आहे. याव्यतिरिक्त रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे विलास रकटे, बसपचे महावीर कांबळे, मनसेचे उदयसिंह पाटील हेही रिंगणात आहेत. मात्र जयंत पाटील यांच्याविरोधात ‘एकास एक’ उमेदवार देण्याचा प्रयत्न फसल्याने सर्व काही शांत असून, शहरात होणाऱ्या विराट सभांनाही खो बसला आहे.
निवडणूक कोणतीही असो, शहरातील यल्लमा चौक, गांधी चौकातील प्रचार सभा गाजतातच. यावेळी मात्र हे चौक अद्याप शांत आहेत.
चिन्हे मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी कसरत
काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या राजकीय पक्षांची चिन्हे मतदारांच्या परिचयाची आहेत. परंतु इतर अपक्षांची चिन्हे अद्यापही मतदारांपर्यंत पोहोचलेली नाहीत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधात राजू शेट्टी यांचे निवडणूक चिन्ह असलेली ‘शिट्टी’ चांगलीच गाजली होती. याचा फायदा विधानसभा निवडणुकीत उठविण्यासाठी स्वाभिमानीचे बंडखोर उमेदवार बी. जी. पाटील यांनी शिट्टी हेच चिन्ह घेऊन प्रचाराला गती आणली आहे.