एकेकाळी सांगली ते मिरज मीटरगेज रेल्वेसेवा सुरू होती. या रेल्वेच्या सांगलीतील शेवटच्या थांब्याला जुने रेल्वे स्टेशन म्हणत. तेथील चौकालाच ‘स्टेशन चौक’ असे नाव पडले. सध्याची आमराई बागही स्टेशन चौकापर्यंत होती, असे जुने लोक सांगतात. १९७१ मध्ये येथून रेल्वे स्टेशन हलविण्यात आले. हा रेल्वेमार्ग बंद झाला. मात्र ‘स्टेशन चौक’ तसाच राहिला. पुढे अनेक राजकीय पक्षांच्या सभाही या चौकात होत राहिल्या. त्यासाठी तत्कालीन नगरपालिकेने उंच सभामंडप बांधला. जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील नेत्यांनाही स्टेशन चौकाबद्दल कुतूहल होते. महात्मा गांधी यांची सभाही स्टेशन चौकात झाली आहे. पुढे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण महत्त्वाची घोषणा करण्यासाठी स्टेशन चौकातच सभा घेत. मोरारजी देसाई, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंढे या दिवंगत नेत्यांनीही आपापल्या शैलीत स्टेशन चौकातील सभा गाजविल्या. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा स्टेशन चौकात झाली आहे. सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांच्या सभांचा स्टेशन चौक साक्षीदार आहे. मोर्चे, आंदोलनाच्या सभाही या चौकात झाल्या आणि आजही होत आहेत.
चौकट
कारंजा
तत्कालीन संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांच्या एकसष्टीनिमित्त लोकवर्गणी गोळा करण्यात आली होती. एकसष्टी गौरव सोहळा झाल्यानंतर राहिलेल्या रकमेतून स्टेशन चौकात कारंजा उभारण्यात आला. तो आजही आहे.