सांगली : शहरातील शिंदेमळा परिसरात जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात यश राजू बंडगर (वय २१, रा. जुना कुपवाड रोड, सांगली) हा गंभीर जखमी झाला असून त्याने मुस्तफा ऊर्फ मुस्त्या समलेवाले (रा. वडर गल्ली, सांगली) याच्या विरोधात संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी यश याचे शिंदेमळा येथे चिकन सेंटर आहे. यश याचा संशयित मुस्तफा समलेवाले याच्यासोबत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच जुन्या भांडणाच्या रागातून समलेवाले हा बुधवारी रात्री चिकन सेंटरजवळ आला व त्याने माझ्याबद्दल दुसऱ्या मुलांना काय काय सांगतोस, असे म्हणत कोंबडी कापण्याच्या चाकूने बंडगर याच्या हातावर आणि कपाळावर वार करत त्याला गंभीर जखमी केले. यशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपासाच्या सूचना दिल्या. संजयनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.