लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पावसाचा वाढलेला जोर आणि नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुराचे पाणी पाहण्यासाठी उत्साही सांगलीकरांची आयर्विन पुलावर गर्दी होत असल्याने शुक्रवारी पोलिसांनी याठिकाणी सेल्फी काढणाऱ्या तरुणांवर कारवाई केली. याशिवाय पुराच्या पाण्यात कोणीही उड्या टाकू नये, यासाठीही पोलीस पथक पुलावर तैनात होते.
शुक्रवारी सकाळपासूनच पाऊस आणि कृष्णा नदीतील पाणी पातळी झपाट्याने वाढली. प्रशासनाकडून पुराचा फटका बसलेल्या भागात मदतकार्य सुरू केले असतानाच काही उत्साही तरुणांनी पुलावर गर्दी केली. व्हिडिओसह सेल्फी व व्हिडिओ कॉल करून पाणी दाखविण्यासाठी तरुणांची गर्दी झाली होती. शहरात अगोदरच कायम असलेली कोरोनास्थिती आणि त्यात तरुणांनी पुलावर केलेल्या गर्दीमुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत तरुणांना तिथून हुसकावले. याशिवाय अनेकजण अगदी नदीकाठावर जाऊन स्टंटबाजीही करत होते अशा तरुणांनाही पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी या परिसरात भेट देऊन पाहणी करत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिल्याने पुलावरील गर्दी कमी झाली होती.