गाळातून सोने शोधणारा झारी सोनार उपेक्षित; शिराळ्यात सराफांच्या दारातील नाल्यात घेतायत सोन्याचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 05:28 PM2024-12-10T17:28:28+5:302024-12-10T17:28:43+5:30
वस्तू शोधल्यास बक्षिसी
विकास शहा
शिराळा : एक उपेक्षित व्यवसाय आणि व्यावसायिक म्हणजे ‘झारी सोनार’ गावोगावी भटकत नाले, सांडपाण्यातून सोन्या-चांदीच्या वस्तू शोधून आपला उदरनिर्वाह करणारे नागरिक! दिवसभर या सांडपाण्यात राहून त्यांची भटकंती सुरू असते. काही मिळाले तर ठीक नाहीतर परत दुसऱ्या दिवशी, त्याच उत्साहाने कामाला सुरू.
निपाणी (कर्नाटक) येथील एक कुटुंब शिराळा येथे आले असून, गावातील प्रत्येक सराफ दुकानदारांच्या दाराजवळील नाल्यात उतरून सोने-चांदी आदी वस्तूंचा शोध ते घेत आहेत.
नागेंद्र हरिजन व त्यांच्या पत्नी मीना हरिजन, आई यल्लमा शेट्टी, दोन वर्षांची अक्षदा, नागेंद्र यांचे मेहुणे आनंद शेट्टी हे शिराळ्यात आले आहेत. हा व्यवसाय करणारी ही त्यांची तिसरी पिढी आहे.
दिवाळीनंतर त्यांची भटकंती सुरू होते. दिवाळीत सराफ, तसेच नागरिक घरांची झाडलोट करतात व हा कचरा नाल्यात टाकला जातो. पावसाळ्यामुळे गटारीतील जादाचा अनावश्यक कचरा वाहून गेलेला असतो. या कुटुंबातील एक व्यक्ती नाल्यातील पाण्यात उतरून वाळूमिश्रित गाळ पाटीमध्ये घेतात. या गाळात खरे, खोटे दागिने अथवा सोन्या-चांदीचे तुकडे आढळून येतात. यातील आवश्यक गोष्टी त्या आपल्याबरोबर घेतात.
वस्तू शोधल्यास बक्षिसी
आमचा हा व्यवसाय करणारी तिसरी पिढी आहे. काहीवेळा सराफ आम्हाला एखादा दागिना हरवला आहे तो मिळतो का पाहा, असे सांगतात. त्यादृष्टीने आम्ही गाळ तपासतो व अशा वस्तू मिळाल्यास आम्हाला हे सराफ बक्षीस देतात. बांबवडे येथे गंठन शोधण्यास सांगितले. ही वस्तू हुडकून दिल्यावर संबंधित सराफ यांनी एक हजार रुपये बक्षीस दिले होते. माझ्या तीन मुली आश्रमशाळेत शिकत असून चौथी दोन वर्षांच्या अक्षदा हिला बरोबर घेऊन फिरत आहे. - नागेंद्र हरिजन, झारी सराफ व्यावसायिक, निपाणी