मिरज : मिरज, सांगली व परिसरात शुक्रवारी दुपारी खगोलप्रेमींनी शून्य सावली अनुभवली. शून्य सावलीचा खेळ दुपारी १२ वाजून २८ मिनिटांनी सुरू होऊन १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत सुमारे ६ मिनिटे रंगला होता.
मिरजेतील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक व बी.एस्सी.च्या विद्यार्थ्यांनी शून्य सावलीची प्रायोगिकरीत्या निरीक्षणे नोंदवली. उत्तरायण-दक्षिणायनदरम्यान जेव्हा सूर्याचे स्थान हे पृथ्वीवरील ठिकाणच्या अक्षांशाबरोबर जुळते तेव्हा सूर्य तंतोतंत डोक्यावर असतो. तो दिवस ‘शून्य सावली दिवस’ म्हणून ओळखला जातो. शून्य सावलीच्या दिवशी, जेव्हा सूर्य स्थानिक मध्यान्ह ओलांडतो, तेव्हा सूर्यकिरण जमिनीवरील वस्तूंच्या अगदी उभ्या पडतात आणि त्याची कोणत्याही प्रकारची सावली आपणास दिसत नाही.
यावर्षी शुक्रवारी मिरज, सांगली व परिसरात दुपारी १२ वाजून २८ मिनिट ते १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत ६ मिनिटे खगोलप्रेमींनी शून्य सावली अनुभवली. शुक्रवारी सकाळपासूनच मिरज व सांगली परिसरात ढगाळ हवामान असल्याने खगोलप्रेमींना शून्य सावली अनुभवता येईल की नाही याची चिंता होती. मात्र दुपारी १२ वाजता सूर्याची प्रखर किरणे दिसू लागल्याने खगोलप्रेमींना दिलासा मिळाला. शून्य सावली प्रायोगिकरीत्या अनुभवण्यात आली. कोरोना प्रादुर्भावामुळे ही निरीक्षणे घरातूनच घेण्यात आली. शून्य सावलीच्या निरीक्षणांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष शेळके व भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. जे. एल. भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शून्य सावली दिवस खगोलप्रेमींना यावर्षी दि. ५ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांनी पुन्हा अनुभवता येणार असल्याचेही प्रा. भोसले यांनी सांगितले.