कलाकार मानधनचे लाभार्थी शोधासाठी धावाधाव, राज्यात सर्वाधिक सांगलीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 12:04 PM2024-12-09T12:04:48+5:302024-12-09T12:05:21+5:30
मृत कलाकारांच्या वारसांना संपर्काचे आवाहन
सांगली : कलाकार मानधन योजनेतील पात्र लाभार्थींच्या शोधासाठी जिल्हा परिषदेची धावाधाव सुरू झाली आहे. मानधन योजनेची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. पण शहरी भागातील लाभार्थी कसे शोधायचे? असा प्रश्न प्रशासनासमोर आहे.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबवली जाणारी ही योजना सध्या ग्रामपंचायत विभागाकडे सोपविण्यात आली आहे. या विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघटनेने ही योजना स्वीकारण्यास नकार दिला होता. या वादात सुमारे वर्षभर मानधन रखडले होते. सध्या मात्र नियमित मिळत असल्याची माहिती कलाकार निवड समितीचे अध्यक्ष विजय कडणे यांनी दिली. यादरम्यान, या योजनेचे हयात लाभार्थी शोधण्याची सूचना शासनाने जिल्हा परिषदेला दिली आहे. त्यानुसार माहिती घेण्याचे काम सुरू आहे. पण शहरी भागातील लाभार्थी कसे शोधायचे? असा प्रश्न प्रशासनापुढे आहे.
शहरात जिल्हा परिषदेची यंत्रणा नाही, तर महापालिकेकडे कलाकार मानधन योजनेच्या नोंदी नाहीत. या स्थितीत जिल्हा परिषदेने बॅंकांकडे कार्यरत खात्यांची माहिती मागितली आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत निवड समितीची बैठक झालेली नाही. त्यामुळे कलाकारांचे प्रस्ताव निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.
मुंबईपेक्षा सांगली आघाडीवर
राज्यात सर्वाधिक म्हणजे १८०० हून अधिक लाभार्थी सांगली जिल्ह्यात आहेत. मुंबईत सुमारे १२०० आहेत, त्या तुलनेत सांगली आघाडीवर आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्याच्या कलाकार निवड समित्यांनी ही योजना सर्वसामान्य कलाकारांपर्यंत पोहोचविल्याचा फायदा झाला आहे. कलाकारांना महिन्याला सरसकट पाच हजार रुपये मानधन मिळते.
निवडणूक काळात योजनेची नोंदणी काही काळ रेंगाळली होती. सध्या लिंक खुली होईल, तेव्हा पात्र कलाकारांनी मानधनासाठीचे प्रस्ताव सर्व कागदपत्रांसह ऑनलाईन स्वरूपात दाखल करावेत. कलाकाराचे निधन झाले असल्यास त्याच्या पत्नीने मृत्यूच्या दाखल्यासह संपर्क करावा. वारसदार म्हणून पत्नीच्या नावे मानधन सुरू होते. - विजय कडणे, अध्यक्ष, कलाकार मानधन निवड समिती