१ कोटी ४१ लाखांचा साताऱ्यात अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 01:58 AM2018-11-02T01:58:45+5:302018-11-02T01:59:02+5:30
एटीएममध्ये पैसे न भरता केली फसवणूक
सातारा : बँकेतील पैसे एटीएममध्ये भरणाºया एका खासगी कंपनीच्या कर्मचाºयांनी आपापसात संगनमत करून १ कोटी ४१ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद अंकुश शिंदे (वय ४१), विक्रम जयसिंग शिंदे (३५, दोघे रा. अंगापूर वंदन, ता. कोरेगाव) व वैभव लक्ष्मण वाघमळे (३४, कण्हेर, ता. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, सिक्युरिट्रन्स इंडिया प्रा. लि. कोल्हापूर ही कंपनी विविध बँकांचे पैसे एटीएममध्ये भरण्याचे काम करते. त्यांच्याकडे सातारा शहर आणि परिसरातील विविध बँकेच्या ३५ एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम होते. या तिघांनी ७ आॅगस्ट २०१८ रोजी एसबीआय बँकेतून ७८ लाख रुपये एटीएममध्ये भरण्यासाठी घेतले. त्यापैकी केवळ ३५ लाख रुपये भरले, तर ४३ लाख भरले नाहीत. तसेच अॅक्सिस बँकेतून ६६ लाख रुपये व बँक आॅफ महाराष्ट्रमधून ३२ लाख रुपये असे एकूण १ कोटी ४१ लाख रुपये न भरता त्याचा अपहार केला.