पाचवड : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यावरील सुमारे १२० कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगार मिळत नसल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारपासूनच टोलनाक्यावरील सर्वच कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या अचानक संपामुळे टोल नाक्यापासून काही किलोमीटरवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लेनवर गर्दी वाढल्याने सर्वच वाहने विना टोल तशीच सोडून देण्यात आली.
कोरोना व फास्टॅगच्या सक्तीमुळे अनेक कर्मचाऱ्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असताना तीन महिन्यांपासून पगार न झाल्याने कुटुंब चालवायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. दुपारच्या शिफ्टला येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. मात्र कोणीच कामावर हजर न झाल्याने दोन्ही बाजूच्या लेन बंद करून सर्वच वाहने मोफत सोडली गेली. दिल्लीपर्यंत चर्चेत असलेल्या आनेवाडी टोल नाक्यावर नेहमीच काही ना काही घडत असते.
गेल्या वर्षीपासून येथे महिला कर्मचारीही कामावर आहेत. शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास येथील पुरुष व महिला कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन तीन ते चार महिन्यांपासून न मिळालेल्या वेतनामुळे कोणीही बूथवर न जाता टोल ऑफिसमोर बसून राहण्याचा निर्णय घेतला. टोल व्यवस्थापकांशी सर्व कर्मचाऱ्यांनी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी शनिवार, दि. २० पर्यंत काम सुरू ठेवा असे सांगितले. मात्र कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तीन ते चार महिन्याचे वेतन त्यांना देण्याची जबाबदारी कोणीही घेत नव्हते. ठोस आश्वासनाशिवाय कामावर हजर होणार नाही असा निर्णय घेत टोल ऑफिससमोर ठिय्या मांडला होता.
रात्रीही वाहने सुसाट
कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर काम बंद आंदोलन केल्याने सर्व वाहने मोफत सोडली जात होती. रात्री उशिरापर्यंत टोलनाक्यावर टोल घेण्याची इतर कोणतीही व्यवस्था न झाल्याने त्यामुळे वाहने विनाटोल सोडली गेल्याने सर्वच वाहनचालकानी टोलबचतीचा आनंद लुटला. मात्र काही वाहनचालक कुतुहलाने टोलवसुली का केली जात नाही, याची वाहने थांबवून चौकशी करत होते. त्यामुळे रांगा लागत होत्या.