निवृत्त मंडलाधिकाऱ्याच्या घरातून १७ तोळे सोने, पाच लाखांची रोकड चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:25 AM2019-07-19T11:25:50+5:302019-07-19T11:26:50+5:30
काशीळ, ता. सातारा येथे निवृत्त मंडलाधिकाऱ्याचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १७ तोळ्याचे दागिने आणि पाच लाखांची रोकड असा सुमारे सात लाखांचा ऐवज चोरून नेल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली.
नागठाणे : काशीळ, ता. सातारा येथे निवृत्त मंडलाधिकाऱ्याचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १७ तोळ्याचे दागिने आणि पाच लाखांची रोकड असा सुमारे सात लाखांचा ऐवज चोरून नेल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुलाबमहमंद महिबुब भालदार (वय ६४) हे सेवानिवृत्त मंडलाधिकारी असून आपली पत्नी रमीजा यांच्यासोबत काशीळ, ता. सातारा येथे वास्तव्यास आहेत. त्यांना रशीद व सुलतान अशी दोन विवाहित मुले असून त्यापैंकी रशीद हा नोकरीनिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहे. शुक्रवार, दि. १२ जुलै रोजी ते आपल्या मुलास भेटण्यासाठी पत्नीसमवेत मुंबईला गेले होते.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी त्यांच्या घराचा दरवाजा काहींना उघडा दिसला. त्यामुळे त्यांनी भालदार यांना याची माहिती दिली. ते मुलासह परत मुंबईहून काशीळ येथे आले. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाट फोडून तब्बल १७ तोळ्याचे दागिने आणि पाच लाखांची रोकड असा सुमारे सात लाखांचा ऐवज गायब केल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. या प्रकारानंतर त्यांनी तत्काळ याची माहिती बोरगाव पोलिसांना दिली.
पोलिसांनी ठसे तज्ज्ञ तसेच श्वान पथकास पाचारण केले. मात्र, आक्षेपार्ह काही सापडले नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी यांनी घटनास्थळाची पाहणी करून चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश राठोड हे करत आहेत.