वेळे : कवठे येथे परिसरातील एका गावातून एक रुग्ण सर्दी व घशाच्या त्रासामुळे तपासणीसाठी आला होता. संबंधित रुग्ण कवठे आरोग्य केंद्र्रांतर्गत गावातील असून, गेले आठवडाभर त्याला सर्दीचा त्रास जाणवत असल्याने तो कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये याअगोदर दोनवेळा येऊन गेला होता. परंतु तरीही तब्येत व्यवस्थित न झाल्याने व घशात दुखू लागल्याने तो आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आला. डॉ. विजय ठोंबरे यांनी त्याची तपासणी केली.
या रुग्णाने घशात त्रास होत असल्याबद्दल सांगितल्याने त्याच्या पुढील तपासणीसाठी त्याला सातारा येथील रुग्णालयात पाठविण्याचे डॉक्टरांनी निश्चित केले व त्यानुसार परिसरातील उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. परंतु कोणत्याही चालकाने त्यांचा फोन उचलला नाही. दुपारी दोन वाजता आलेला रुग्ण तसाच दवाखान्यामध्ये ठेवण्यात आला.
कवठे गावातील कोरोना निर्मूलनासाठी स्थापन केलेल्या आरोग्य समितीला डॉक्टरांनी पाचारण केले व या रुग्णासाठी रुग्णवाहिकेशी संपर्क साधावयाची विनंती केली. उपस्थित सर्वच सदस्यांनी आपापल्या परीने फोनवरून संपर्क साधण्याचे प्रयत्न केल्यानंतर रात्री आठ वाजता संबंधित रुग्ण नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाली.वास्तविकत: सद्य:स्थितीत वाई तालुक्यात परिस्थिती अजूनही चांगली आहे. तालुक्यात अजून तरी कोरोना रुग्ण नाही. तरीसुद्धा अशा परिस्थितीत जेथे शासकीय यंत्रणेवर म्हणावा असा ताण नाही, अशी परिस्थिती असताना जर कोरोना चाचणीसाठी रुग्ण नेण्यास रुग्णवाहिका सहा तास विलंबाने येत असेल तर परिस्थिती बिघडली व आपत्कालीन परिस्थिती झाली तर अशावेळी मात्र काय अवस्था होईल? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता. पेशंट सातारा येथे दाखल करण्यात आला असून, त्याच्या कोरोनासंदर्भातील पुढील तपासण्या करण्यात येत आहेत.रुग्णाचे मुळगाव हैदराबाद परिसरातील असून, तो महिन्याभरापूर्वी परिसरातील गावात कामानिमित्त आला होता. लॉकडाऊनमध्ये अडकल्याने त्याला आपल्या मूळगावी जाता आले नाही. या कालावधीत आजारी पडल्याने तो पेशंट कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र्र्रात उपचारासाठी येत होता. घशात दुखण्याचा त्रास या रुग्णास जाणवत असला तरी त्याच्याबाबत कोणतीही धोकादायक बाब जाणवत नसली तरीसुद्धा पूर्वकाळजी म्हणून सदर रुग्णास सातारा येथे पुढील चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे.