सातारा जिल्ह्यात २३ बाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:25 AM2021-07-09T04:25:34+5:302021-07-09T04:25:34+5:30
सातारा : जिल्ह्यात गुरुवारी १ हजार १० नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून, २३ बाधितांचा मृत्यू झाला. कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक ...
सातारा : जिल्ह्यात गुरुवारी १ हजार १० नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून, २३ बाधितांचा मृत्यू झाला. कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक ३२७ रुग्ण आढळले आहेत.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर कऱ्हाड तालुक्यातील रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळते आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेने सर्वाधिक रुग्ण कऱ्हाड तालुक्यातच आढळून येत आहेत. या तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ३० हजार २९ वर जाऊन पोहोचली आहे. कऱ्हाड तालुक्याच्या खालोखाल सातारा तालुक्यात रुग्णांची संख्या आहे. सातारा तालुक्यात १६७ बाधित रुग्ण आढळून आले. सातारा तालुक्यातील रुग्णसंख्या ४१ हजार ७४५ इतकी झाली आहे.
जिल्ह्यातील २ लाख ४९८ रुग्ण कोरोनाबाधित झाले. त्यामध्ये ४ हजार ८३५ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. गुरुवारी सातारा तालुक्यात ७, फलटण तालुक्यात ५, खटाव व माण तालुक्यातील प्रत्येकी ३ व कऱ्हाड, वाई तालुक्यांतील प्रत्येकी २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे सातारा तालुक्यातील १ हजार २३८ तर, कऱ्हाड तालुक्यातील ९०३ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत ६५९ जणांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८७ हजार १७२ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. ९ हजार १५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील कोरोना वाढीचा दर १४. ६१ टक्के
आरटीपीसीआर चाचणीनुसार सातारा जिल्ह्यातील कोरोनावाढीचा दर १४.६१ टक्के इतका झाला आहे. बुधवारच्या तुलनेत हा दर कमी झाला असला तरी पाच दिवसाची सरासरी घेऊनच जिल्हाधिकारी शुक्रवारी निर्बंधाबाबत निर्णय घेणार आहेत.