सातारा : सह्याद्रीच्या कुशीत अन् अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या चार भिंतीला ऐतिहासीक महत्त्व आहे. पण फिरायला येणाऱ्या काही तरुणांनी टाकलेल्या दारूच्या बाटल्या तसेच नागरिक खाद्यपदार्थांचे कागद टाकून विद्रूप झाला. येथील ऐतिहासिक वारसा स्वच्छता व संवर्धन मित्रमंडळाच्या वतीने तीन दिवस परिसराची स्वच्छता करुन तब्बल २५ पोती कचरा जमा केला.ऐतिहासीक स्थळांची झालेली दयनिय अवस्था पाहावत नाही. तसेच त्याची निगा राखण्यासाठी पालिकेकडूनही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे येथील ऐतिहासिक वारसा स्वच्छता व संवर्धन मित्रमंडळाने चार भिंत स्वच्छतेचा उपक्रम राबविला.मोहिमेच्या पहिल्या दिवशी सकाळी सात ते दहा या वेळेत पायथा, पार्किंगसह मुख्य प्रवेश कमानीपर्यंत स्वच्छता करण्यात आली. त्यात सुमारे चार पोती कचरा जमा केला. दुसऱ्या दिवशी मुख्य कमान ते भिंतीच्या मध्यापर्यंत स्वच्छता करण्यात आली.
सुमारे साडेतीन तास चाललेल्या मोहीमेत आठ पोती कचरा व दारूच्या बाटल्या जमा केल्या. तिसऱ्या दिवशी मध्यवर्ती भिंत ते मुख्य स्मारक संपूर्ण भागाची स्वच्छता केली. या मोहीमेत २५ पोती कचरा व दोन पोती दारूच्या बाटल्या जमा केल्या. दारू पिऊन फोडलेल्या बाटल्यांचा हिशोबच नव्हता....आता चारभिंती संवर्धनावर लक्षसलग तीन दिवसांच्या अथक परिश्रमाने चारभिंती चकाचक करण्यात मित्रमंडळाला यश आले आहे. आता संवर्धन करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. संवर्धनासाठी लवकरच शासनस्तरावर पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती मित्रमंडळाचे सर्वेसर्वा शुभम मांडवेकर यांनी दिली.मोहीमेत सहभागी सदस्यया मोहीमेत शुभम मांडवेकर, उत्कर्ष शिंदे, रोहन शेलार, प्रज्योत वडेट्टीवार, शुभम आवळे, अमेय कुलकर्णी, ओमकार कदम, सुरज देशमुख, निलेश शिंगाडे, अक्षय ताटे, अभिजीत मुरकुटे, अक्षय शेलार, ओमकार शिंदे, ऋषीकेश गायकवाड, रोहित ताटपुजे, विशाल मोहिते, अनिकेत कर्णे, साहिल पटेल, शुभम निकम यांनी सहभाग घेतला.कचरा पेटींची नासधूस, मित्रमंडळातर्फे पुन्हा डागडुजी
चारभिंतीवर येणारे नागरिक खाद्यपदार्थ घेऊन येतात. तेथे भेळ किंवा अन्य पदार्थ खाऊन प्लॅस्टिकच्या पिशव्या, कागदाचे गोळे टाकण्यासाठी पालिकेने कचराकुंडी ठेवलेली नाही. त्यामुळे मित्रमंडळातर्फे खोकी ठेवून कचरापेट्यांची व्यवस्था केली. पण काही विघ्नसंतोषी लोकांनी त्यांची नासधूस केल्याचे दिसून आले. मित्रमंडळातर्फे त्यांची पुन्हा डागडुजी करण्यात आली.