सातारा जिल्ह्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचे ३१२ रुग्ण; आरोग्य विभागाने केले आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 12:42 PM2023-10-04T12:42:35+5:302023-10-04T12:43:08+5:30
आरोग्य केंद्रात पुरेसा औषधसाठा उपलब्ध
सातारा : जिल्ह्यात पाऊस पडत असल्यामुळे डासाच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. डेंग्यू व चिकुनगुन्याचे रुग्ण आढळून येत आहेत. २०२३ या वर्षात आतापर्यंत ३१२ रुग्ण हे डेंग्यू आणि चिकुनगुन्याचे स्पष्ट झाले आहेत. यापार्श्वभूमीवर आरोग्य केंद्रात पुरेसा औषधसाठा असून, नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत देण्यात आलेली माहिती अशी की, यावर्षी आतापर्यंत एकूण १०२८ संशयित रुग्ण सापडले आहेत. सर्व रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. तपासणीनंतर ३१२ जणांना डेंग्यू व चिकुनगुन्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व रुग्णांवर औषधोपचार करण्यात आला, तर यावर्षी सातारा जिल्ह्यात एकूण १२ ठिकाणी डेंग्यू आणि चिकुनगुन्या आजाराची साथी आली होती. यामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
दरम्यान, आरोग्य विभागाने डेंग्यू आणि चिकुनगुन्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन केले आहे. त्यानुसार इमारतीवरील टाक्या, हौद यांना घट्ट झाकण बसविणे. घरातील टायर, भंगार सामान, रिकामे डबे, बाटल्या, प्लास्टिक साहित्याची विल्हेवाट लावणे. घरातील कूलर, फूलदाण्यावेळीच स्वच्छ करून ठेवणे.
आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. डासांच्या नियंत्रणसाठी कीटकनाशके फवारणी, धूर फवारणी करावी, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि जिल्हास्तरावर पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. तसेच, हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या आदीबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. रुग्णांना तातडीची उपचार आणि वैद्यकीय सेवा देण्याची सूचना जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना केलेली आहे. - डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी