हत्तीवर बसण्यासाठी ३२ हजारांची बोली
By admin | Published: September 7, 2015 09:10 PM2015-09-07T21:10:09+5:302015-09-07T21:10:09+5:30
कुंतीमाता उत्सव : उंब्रजच्या यात्रेत हजारो भाविकांची उपस्थिती
उंब्रज : ‘कुंतीमाता की जय, भीमसेन महाराज की जय’ या जयघोषात गुलालाच्या उधळणीत, बेंजोच्या दणक्यात, टाळ-मृदंगाच्या गजरात सोमवारी दुपारी कुंती मातेच्या मूर्तीच्या मिरवणुकीस सुरुवात झाली.
रितीरिवाजानुसार कुंतीमातेसह मूर्तीसह हत्तीवर बसण्याचा मान प्रमोद शाह यंना मिळाला. त्यांनी ३२,२५१ रुपये बोली बोलून मान मिळविला. कुंती मातेच्या मूर्तीसह हत्तीवर शाह विराजमान झाल्यानंतर मिरवणुकीस सुरुवात झाली.
कुंती मातेची मूर्ती तयार करण्यात आलेल्या महामुनी यांच्या घरापासून मिरवणूक सुरू झाली.
भैरवनाथ मंदिर ते ग्रामपंचायत मार्ग मिरवणूक बाजारपेठेत आली. बाजारपेठेतून मिरवणूक शिवाजी चौकातून राष्ट्रीय महामार्ग ओलांडून मारुती मंदिराजवळ गेली. तेथे मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली व परत मिरवणूक महामार्ग ओलांडून शिवाजी चौकातून बाजारपेठेत आली. तेथून मिरवणूक भीम मंडपात गेली.
भीम मंडपाची भीमसेन महाराज यांची भव्य १० फुटी मूर्ती व गजराजावर आरुढ झालेली कुंती मातेशी मूर्ती या समोरासमोर आल्यानंतर भाविकांनी केलेला जयजयकार व भावनिक वातावरणात माता-पुत्रांची भेट झाली. ही भेट सूर्यास्ताच्या गोरज मुहूर्तावरच घडविली जाते. व अनोख्या उत्सवास सुरुवात झाली. (प्रतिनिधी)
राजपुतांचा पारंपरिक मान
यात्रेत बाळगोपाळाच्या खेळण्यासाठी उंच पाळण्यासह इतर पाळणे आणण्यात आले होते. तर विविध खेळण्यांची दुकाने, हॉटेल यामुळे बाजारपेठेत गर्दीच गर्दी दिसून येत होती. याच मिरवणुकीच्या दरम्यान, राजस्थानच्या राजपुतांची गेली चार पिढ्या स्थायिक झालेल्या हजारो कुटुंबीयांची ‘मान’ असलेल्या मायाक्कादेवीची मिरवणूक ही कृष्णा नदीवर स्थानासाठी जाते.