सातारा : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी राज्यभर रान पेटवले असतानाच प्रशासकीय यंत्रणांनीही कुणबी दाखले शोधण्याची मोहीम गतिमान केली आहे. जिल्ह्यात नोंदी शोधण्यास प्रारंभ झाल्यापासून आजअखेर तब्बल १९ लाख १९ हजार ३१५ नोंदी तपासल्या आहेत. यापैकी ११ लाख २३ लाख ४५० १९४८ पूर्वीच्या आहेत.जिल्ह्यात सध्या महसूल, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कारागृह विभाग, पोलिस, सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, भूमिअभिलेख विभाग, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जिल्हा वक्फ अधिकारी विभाग, जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग तसेच सर्व आस्थापना नोंदी तपासणीच्या कामात गुंतल्या आहेत. प्रांताधिकाऱ्यांनी आपल्या हद्दीतील तहसीलदारांना याबाबत कक्ष स्थापन करण्यास सांगितले. त्यानुसार जिल्ह्यात ११ तहसील कार्यालयांत कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात पुरावे संकलन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. याठिकाणी १८६६ पासूनच्या उपलब्ध नोंदी तपासल्या जात आहेत. या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षाकडे पाठवल्या जात आहेत. जुन्या नोंदी तपासण्याचे काम क्लिष्ट असून मोडी लिपीतज्ज्ञांची मदतही लागत आहे, तरीही हे आव्हान प्रशासनाने पेलले असून तपासलेल्या १९ लाख १९ हजार ३१५ नोंदींपैकी तब्बल ११ लाख २३ लाख ४५० नोंदी या १९४८ पूर्वीच्या आहेत, तर १९४८ ते १९६७ पर्यंत ७ लाख ९५ हजार ८६५ नोंदी तपासल्या आहेत. राज्यभरात या नोंदी शोधण्याचे काम सुरूच असून त्यानंतर ज्या नोंदी आढळून येतील त्याचे जतन केले जाणार आहे. मराठा आरक्षण प्रक्रियेत पुढील टप्प्यावर हे पुरावे तथा नोंदींची गरज लागणार आहे.
- तपासलेल्या नोंदी १९,१९,३१५
- १९४८-१९६७ काळातील नोंदी ७,९५८६५
- १९४८ पूर्वीच्या नोंदी ११,२५४५०
मराठा कुणबी नोंदी सापडल्या ४०९०९जिल्ह्यात आजपर्यंत १९ लाख १९ हजार ३१५ नोंदीची तपासणी केली असून मराठा कुणबी व कुणबी मराठा अशा ४० हजार ९०९ नाेंदी सापडल्या आहेत. नोंदी शोधण्याचे काम अजूनही सुरू असून प्रशासन सर्व विभागांकडून याबाबतची माहिती संकलित करत आहे. - नागशे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी, सातारा