४१ माणसांचं कुटुंब रमलं एका छतात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:06 AM2018-05-15T00:06:45+5:302018-05-15T00:06:45+5:30
जगदीश कोष्टी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : काळ बदलत चाललाय... कुटुंब छोटं बनत चाललंय.. छोट्या कुटुंबातही भांड्याला भांडे लागतात अन् वादावादी होते; पण या सर्वांना छेद देत तब्बल ४१ माणसांचं कुटुंब एका छताखाली गुण्यागोविंदानं एकत्र नांदत आहे. साताऱ्यातील टंकसाळे कुटुंबाला एखाद्या लग्नासाठी जायचे असल्यास स्वत:साठी एक ते दोन गाड्या लागतात.
माणूस हा कुटुंबवत्सल प्राणी आहे. तो कुटुंबाशिवाय फार काळ अलिप्त राहू शकत नाही. एकेकाळी आई-वडील, नवरा-बायको, तीन मुले असं सरासरी सहा ते सात माणसांचं कुटुंब असायचं. दरम्यानच्या काळात मुलांची लग्न झाली. सुना आल्या. कोणाशीच जमत नव्हतं, असं म्हणत घरात वाटण्या होतात अन् एकाचे दोन, तीन घरं कधी होतात, हे कळतही नाही. आता हे कुटुंब केवळ नवरा-बायको अन् एक मुल एवढ्यावर आलं आहे; पण याला साताºयातील टंकसाळे परिवार अपवाद ठरत आहे. या घरात आजही चाळीस जण एकत्र राहत आहेत.
टंकसाळे कुटुंबीय मूळचे निनाम पाडळी येथील. रामचंद्र टंकसाळे हे साताºयात वखार व्यवसायाच्या निमित्ताने शंभर वर्षांपूर्वी साताºयात आले. त्यांची जुना मोटारस्टँड परिसरात वखार आहे. रामचंद्र टंकसाळे यांना दिगंबर, कृष्णाजी व विजय तीन मुले झाली. यातून त्यांच्या कुटुंबाचा विस्तार वाढत गेला. त्यांच्यातील दिगंबर हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांचे निधन झाले. या कुटुंबात सध्या कृष्णाजी आणि विजय हे कुुटुंब प्रमुखाची भूमिका पार पाडत आहेत. घरात तिघांचे मिळून सात मुलं आहेत. सर्वांची लग्न झाले असून सासू, सुना, नातवंडे, परतवंडे असे सगळे ४१ जणांचे हे कुटुंब एकत्रच राहत आहेत. त्यांच्यापैकी तिघांचे कुटुंब मिळून बाराजण नोकरी, व्यवसायनिमित्ताने परगावी राहतात; पण दर शनिवार, रविवारी ते एकत्र येतात. या कुटुंबात सर्वात लहान दुर्वा ही आठ महिन्यांची असून, विमल या आजीबाई ८२ वर्षांच्या आहेत.
कमानी हौद परिसरात यांचे दुकान आहे. दुकानाच्या पाठीमागे वाडा पद्धतीने त्यांचे घर आहे. घराच्या मागे व पुढे भले मोठे अंगण आहे. या अंगणातच मुलांचा किलबिलाट सुरू असतो. जागाही मुबलक असली तरी एकच हॉल तेथेच टीव्ही.
बिग बजेट फॅमिली
या कुटुंबाचं अर्थकारणही मोठं आहे. खाणारी माणसं जास्त आहेत. मंडई, किराणा, कपडालत्ता, दुखणं यासाठी मोठा खर्च होतो; पण कधीच अडचण भासत नाही. दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्येक भाऊ दहा हजार रुपये आणून कृष्णाजी यांच्याकडे आणून देतो. त्यातून सत्तर हजार रुपये जमा होतात. त्यातूनच घराचा खर्च केला जातो.
तीन सासवा अन्
दहा सुना
या कुटुंबातील माणसांची संख्या विचारली तर सहजासहजी सांगता येत नाही. त्यांनाच हिशोब करावा लागतो. या कुटुंबात २१ पुरुष व २० महिला आहेत. त्यामध्ये तीन सासवा, दहा सुना आहेत.