प्राथमिक शिक्षकाकडून ४१ वेळा रक्तदान- दाम्पत्याचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:00 AM2019-06-16T00:00:36+5:302019-06-16T00:03:36+5:30
लक्ष्मण गोरे । मूळचे सातारा तालुक्यातील कोंडवे येथील दीपक भुजबळ हे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांच्या पत्नी ...
लक्ष्मण गोरे ।
मूळचे सातारा तालुक्यातील कोंडवे येथील दीपक भुजबळ हे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांच्या पत्नी कांचन या आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत आहेत. रक्तदान, देहदान, नेत्रदान करणे किती गरजेचे आहे, याचे महत्त्व ते सर्वांना सांगत असतात. आजवर ४१ वेळा रक्तदान केलेले भुजबळ आणि त्यांच्या पत्नीने मरणोत्तर देहदान व नेत्रदानाचा संकल्प केला आहे. या दाम्पत्याला देशाची भावी पिढी घडविण्यासाठी ज्ञानदान करण्याचा वसा घेतला आहे. हे करत असतानाच एक सामाजिक विचार घेऊन चांगला माणूस घडविण्याचे काम या दाम्पत्याच्या हातून घडत आहे. त्यामुळे त्यांचा शिक्षण क्षेत्रातही आदर्श घेतला जात आहे. ते वारंवार मार्गदर्शन करत असतात.
बामणोली : गरजूंना मदत करावी, मोठ्यांचे नेहमी ऐकावे, दानधर्म करावे, असे उपदेश करणारे अनेक गुरुजी आपण पाहिलेले असतील. गुरुजी असे काही शिकवताना सांगायला लागले की, ‘सुरू झालं कॅसेट’ अशी कुजबूजही कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये निघते; पण काही गुरुजी असेही आहेत की ते कृतीतून आदर्श घालून देतात. गाढवलीतील मुख्याध्यापक दीपक भुजबळ यांनी आजवर तब्बल ४१ वेळा रक्तदान केले आहे. त्यांची जिल्हा रुग्णालयानेही दखल घेतली आहे.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष महाबळेश्वर तालुक्यातील गाढवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दीपक भुजबळ यांनीही ज्ञानदानाबरोबरच सामाजिक कार्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. भुजबळ यांनी ४१ वेळा रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत अनेकांना जीवदान दिले आहे.
जागतिक रक्तदान दिनानमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयात युवा मोरया सामाजिक संस्था, जॉर्इंट गु्रप आॅफ सातारा आणि क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय रक्तपेढी यांच्या वतीने रक्तदाते कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. यावेळी दीपक भुजबळ यांनी रक्तदान केले. यावेळी जॉर्इंट फेडरेशनचे संचालक अॅड. नितीन शिंगटे, उपाध्यक्ष यशवंत गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. पद्माकर कदम, युवा मोरणा संस्थेचे अध्यक्ष विक्रांत देशमुख, डॉ. पेंढारकर यांच्यासह रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात दीपक भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला.
अठराव्या वर्षी सुरुवात
दीपक भुजबळ यांनी वयाच्या अठराव्या वर्षांपासून रक्तदानास सुरुवात केली. प्राथमिक शिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी विविध सामााजिक उपक्रमांमध्येही आघाडी घेतली आहे. आपण रक्तदान केल्यास कुणाचा तरी जीव वाचणार असल्याने रक्तदान हे प्रत्येकाने करावे, असे ते सांगत असतात. रक्तदानाचे महत्त्व हे शिक्षकांना नेहमी सांगत असतात. रक्तदान केल्याने समाधान वाटते.