खंडाळा : निरा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा या वर्षी वाढला आहे . ऑक्टोबर अखेर असताना नीरा खोऱ्यातील चारही धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे . त्यामुळे सर्वच धरणे ओव्हरफ्लो झालेले आहेत . नीरा खोऱ्यातील चार धरणात सुमारे ४८ टीएमसी पाणीसाठा झाल्याने साहजिकच यापुढील काळात शेती सिंचनात कोणतीही अडचण राहणार नाही . त्यामुळे शेतकरी वर्गासाठी समाधानाची बाब आहे .नीरा खोर्यातील नीरा देवधर, भाटघर , वीर व गुंजवणी या चारही धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत शंभर टक्के आहे . यावर्षी नीरा खोर्यातील नीरा देवधर ११ .७२९ टीएमसी , भाटघर २३ .५०२ टीएमसी ,वीर धरणात ९ .४०८ टीएमसी व गुंजवणी धरणात ३ .६९० टीएमसी एवढा पाणीसाठा पूर्ण क्षमतेने भरला आहे. चारही धरणात मिळून एकूण ४८ .३२९ टीएमसी एवढा मुबलक पाणीसाठा झाला आहे .नीरा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा भरमसाठ झाल्याने पुढील काळात शेतीसाठी त्याचा उपयोग होणार आहे . नीरा खोऱ्यातील धरणाच्या पाण्याचा उपयोग सातारा जिल्ह्यातील खंडाळा , फलटण तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, सांगोला तसेच पुणे जिल्हयातील पुरंदर , बारामती ते इंदापूरपर्यंत होत असतो .
येथील शेती याच पाण्यावर अवलंबून असते. यावर्षी पाणीसाठा मुबलक असल्याने धरणांच्या कालव्याला आवर्तने वेळेवर सोडणे शक्य होणार आहे . त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न उरणार नाही .