महिलेच्या हातातील ५० हजारांची रोकड पळवली-दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांचे कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 01:53 PM2019-05-25T13:53:57+5:302019-05-25T14:07:10+5:30
महिलेच्या हातातील ५० हजारांची रोकड दोघाजणांनी हिसकावून चोरून नेल्याची खळबळजनक घटना शुक्रवार, दि. २४ रोजी भरदुपारी वनवासवाडी येथे घडली.
सातारा : महिलेच्या हातातील ५० हजारांची रोकड दोघाजणांनी हिसकावून चोरून नेल्याची खळबळजनक घटना शुक्रवार, दि. २४ रोजी भरदुपारी वनवासवाडी येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुभद्रा तुकाराम वाघमोडे (वय ७०, रा. वनवासवाडी, कृष्णानगर सातारा) यांचा गृहउपयोगी वस्तू विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याजवळ विक्रीतून आलेली ५० हजारांची रोकड होती. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्या एकट्या चालत घरी निघाल्या होत्या. वनवासवाडी येथील एका मंदिराच्या परिसरात त्या पोहोचल्या असता दुचाकीवरून दोन युवक त्या ठिकाणी आले.
काही क्षणातच त्यांनी वाघमोडे यांच्या डाव्या हातात असलेली पिशवीतील ५० हजारांची रोकड हिसकावली. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून सुसाट निघून गेले. पिशवीमध्ये रोकडसह त्यांचा मोबाईलही होता. या प्रकारानंतर वाघमोडे यांनी आरडाओरड केली. मात्र, त्या ठिकाणी कोणीही नसल्यामुळे त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात येऊन घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी दोन अज्ञात युवकांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे वनवासवाडी, कृष्णानगर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला मारहाण
सातारा : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला मारहाण केल्याच्या आरोपावरून नारायण आसाराम चावरे (वय ३६, रा. चिंचोली, ता. नेवासा, जि. अहमदनगर) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पत्नी मनिषा चावरे (वय ३३) यांनी त्यांचे दुसरे पती नारायण चावरे याच्या विरोधात तक्रार दिली आहे. कोडोलीतील कृष्णा कॉलनीमध्ये मनिषा चावरे या राहत आहेत. या ठिकाणी येऊन नारायण चावरे याने चारित्र्याच्या संशयावरून मनिषा यांना मारहाण केली. तसेच घरखर्चासाठी पैसे न देता मुलांची जबाबदारी टाळून शारीरिक व मानसिक त्रास दिला असल्याचे मनिषा चावरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.