सातारा : राज्य परिवहन महामंडळाचे स्टेअरिंग कोरोनानंतर लॉक झाले होते. आता महामंडळ पूर्ववत सुरू होत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर एसटीने ग्रामीण भागात फेऱ्या वाढविल्या आहेत. त्यामुळे आता दररोज सरासरी ५८९ फेऱ्या सुरू आहेत. या सर्वांना प्रवाशांतूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनानंतर एसटीची वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. ते पूर्ववत आणण्यासाठी विभाग नियंत्रक सागर पळसुले, विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड यांनी विशेष अभियान राबविले आहे. यामध्ये सातारा विभागातून सातारा-मुंबई, बोरिवलीसाठी ३९ शिवशाही गाड्या तसेच महाबळेश्वर-पुणे स्टेशन येथेे सहा शिवशाही गाड्या धावत आहेत.
सातारा-स्वारगेट विनाथांबा ५८ फेऱ्या दररोज केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे फलटण-सातारा, फलटण-पुणे, दहिवडी-सातारा, दहिवडी-कऱ्हाड, वडूज-कऱ्हाड, वडूज-सातारा, कोरेगाव-कऱ्हाड, कोरेगाव-वाठार स्टेशन, महाबळेश्वर-सातारा, महाबळेश्वर-वाई, वाई-स्वारगेट, वाई-सातारा, वाई-वाठार, वाई-सातारा विनाथांबा, निरा-सातारा, कऱ्हाड-शेडगेवाडी, कऱ्हाड-ढेबेवाडी, काले-मसूर, पाटण-कऱ्हाड, पाटण-सातारा या मार्गावर शटल तसेच पूर्वीच्या गाड्या सुरूच आहेत.
प्रवाशांची गरज ओळखून पॅकेज टूर सुरू केली. यात अष्टविनायक, कोकणदर्शण, अकरा मारुती दर्शन, अक्कलकोट, गाणगापूर, खास पर्यटन बसमधून महाबळेश्वर-प्रतापगड-महाबळेश्वर दर्शन, सातारा-महाबळेश्वर-प्रतापगड दर्शन सुरू केले आहेत. त्यांनाही प्रतिसाद मिळत आहे.
चौकट
लांब पल्ल्यांच्या सुरूच
लातूरला तीन, सोलापूरला तेरा, विजापूरला पाच गाड्या धावत आहे. तसेच विभागातून नांदेड, गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर, हैद्राबाद, उस्मानाबाद, बीड, परळी वैजिनाथ, अर्नाळा, वसई, मलकापूर, शिर्डी, औरंगाबाद, नाशिक, सांगली, कोल्हापूर, नृसिंहवाडी, इचलकरंजी, पणजी, पोलादपूर या ठिकाणी दररोज फेऱ्या सुरू केल्या आहेत.