वाई : वाई तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यात १४० रुग्ण आढळून आल्यानंतर आता गेल्या पंधरा दिवसात तालुक्यात नव्या ८६ रुग्णांची नोंद झाली आहे. संक्रमण वाढू लागल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली असून, संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
देशात जानेवारी महिन्यात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण दि. १ मार्चपासून सुरू झाले आहे. कोरोनाची लस आल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान असले तरी, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढल्याने चिंतेत वाढ झाली आहे. वाई तालुक्यातही गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णांचा वेग वाढला आहे. फेब्रुवारी महिन्यात १४० , तर एक मार्चपासून आतापर्यंत ८६ रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र, नागरिक, व्यापारी, विक्रेत्यांकडून प्रशासनाला म्हणावे असे सहकार्य मिळत नाही. मास्कचा वापर न करणे, सोशल डिस्टन्स न पाळणे अशा गोष्टी कोरोना वाढीस कारणीभूत ठरू शकतात. नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे कोटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्य अनिल सावंत, पालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, तालुका आरोग्य अधिकारी संदीप यादव यांनी केले आहे .
(पॉईंटर)
तालुक्याची कोरोना स्थिती...
एकूण बाधित ४२२६
कोरोनामुक्त ४००८
उपचार सुरू २१८
मृत्यू १५१