सातारा : सातारा शहराच्या वाढीव हद्दीसह लगतच्या ग्रामीण भागाकरिता एकूण ९ नवीन लसीकरण केंद्रे संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारित सुरू करण्यात मान्यता घेण्यात आली आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
लवकरच ही नवीन लसीकरण केद्रे १. करंजे पेठ, २. शानभाग शाळा-दौलतनगर, ३.ग्रामपंचायत कार्यालय, शाहुपूरी, ४. विशाल सह्याद्री शाळा-शाहूनगर, ५. ग्रामपंचायत कार्यालय-बिलासपूर, ६.अंगणवाडीशाळा-चंदननगर, आणि ७. विक्रांतनगर,८. खिडबाडी, ९. पीरवाडी येथील जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी पूर्ण क्षमतेने सुरू होतील.
कोरोना या जागतिक संसर्गजन्य महामारीच्या रोगावर कोणतेही रामबाण औषध अद्यापपर्यंत अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे लसीकरणाचा शक्य तितक्या जलद लसीकरण करणे यावर भर देऊन, नजीकच्या काळात १०० टक्के लसीकरण करण्याचे उदि्दष्ट आहे, असे नमूद करून खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमूद केले आहे की, सातारा शहरात राजवाडा येथील पूज्य कस्तुरबा आरोग्य केंद्र, दादामहाराज प्रा.आरोग्य केंद्र, गोडोली, स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे दोन ठिकाणी लसीकरणास सुरुवात झाल्यापासून लसीकरणाची सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तथापि लसीकरणाचे वाढते वयोगट याचा विचार करता ही लसीकरण केंद्रे पुरेशी नाहीत. त्यामुळेच लोकसंख्या आणि उपलब्ध लसीकरण केंद्रे याचा विचार करता, सातारा शहर आणि आजूबाजूच्या परिसरात लसीकरण केंद्रे उभारण्यावावत आम्ही विनंती सूचना केलेली होती.
वाढत्या लसीकरण केंद्रांचा, सुलभ लसीकरण होण्याच्या दृष्टीने नागरिकांना लाभ होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही असे स्वयंनियोजन करुन, स्वयंशिस्तीने आणि आरोग्य कर्मचारी यांच्या लसीकरण केंद्रावरील सूचनांचे पालन करून, आपले आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक
पात्र नागरिकाचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहनही खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्यास मान्यता दिल्याबद्दल आरोग्य विभागाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आभार मानले आहेत.