सातारा : सौरऊर्जा विद्युत प्रकल्प करून देतो, असे आमिष दाखवून दोघांची तब्बल ९३ लाख ६५ हजारांची फसवणूक झाली असून याप्रकरणी कर्नाटक आणि कोलकत्तामधील दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. विशालसिंग हरी बिरजे (रा. खानापूर, बेळगाव, कर्नाटक), रवी अधिकारी (रा. पी. रोड गोविंद, खाटिक रोड, कोलकत्ता वेस्ट बंगाल) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उमेश सदाशिव भोईटे (वय ४०, रा. रविवार पेठ, सातारा) आणि त्यांचे नातेवाईक महेश पवार यांना वरील दोघा संशयितांनी सौरऊर्जा प्रकल्प करून देतो, असे आमिष दाखविले. त्यामुळे भोईटे यांनी ५६ लाख तर पवार यांनी ३७ लाख ६५ हजार रुपये १ मे २०२० ते २०२२ या कालावधीत त्यांना दिले.प्रकल्पाच्या निमित्ताने त्यांच्याशी व्हॉट्सअँपवर फिर्यादी संपर्क साधत होते. त्यावेळी तुमचे काम झाले आहे, असा मेसेज करून पुन्हा मेसेज डिलीट करत होते. त्यामुळे फिर्यादी यांना शंका आली. मोबाइलवर फोन केले असता फोन बंद असल्याचे समोर आले. त्यामुळे उमेश भोईटे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन वरील संशयितांविरोधात फसवणुकीची तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे हे अधिक तपास करीत आहेत.
Satara: सौरऊर्जा प्रकल्पाच्या आमिषाने दोघांना ९३ लाखांचा गंडा, परराज्यातील दोघांवर गुन्हा
By दत्ता यादव | Published: July 12, 2023 6:35 PM