Satara: पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून खामगावात घर जाळले, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 01:03 PM2024-03-06T13:03:42+5:302024-03-06T13:03:56+5:30
फलटण : पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून खामगाव (ता. फलटण) येथील जितेंद्र विलास काळे यांचे घर जाळल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध फलटण ...
फलटण : पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून खामगाव (ता. फलटण) येथील जितेंद्र विलास काळे यांचे घर जाळल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील ५० हजार आणि सोन्याच्या दागिन्यांसह या जाळपोळीत काळे यांच्या घरातील सर्व सामान जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ४ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फिर्यादी जितेंद्र विलास काळे हे त्यांच्या पत्नीसह बाहेरगावी गेले असताना त्यांचे घर जळाल्याची माहिती समजली. ते खामगाव येथे घरी पोहोचले असता त्यांना त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. घराचे कुलूप तुटलेले होते. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता कपाटातील कपडे, रग व घरातील इतर वस्तू जळलेल्या होत्या. तसेच कपाटामध्ये असलेली १९ ग्रॅमची सोन्याची चेन व ५० हजार रुपये रोख रक्कम दिसली नाही.
या जाळपोळ व चोरीप्रकरणी काळे यांनी संशयित जॉनी नंदू भोसले, सागर नंदू भोसले, हिरा शर्करा पवार, किरण पिसुरड्या शिंदे, शायर पाग्या भोसले, वर्धमान आरोग्य शिंदे (सर्व रा. साखरवाडी, ता. फलटण) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. यापूर्वी दिलेल्या तक्रारीवरून त्यांनी काळे यांना ''तक्रार मागे घे, नाहीतर तुझे घरदार जाळून टाकीन'', अशी धमकी दिली होती. काळे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत वरील सहा आरोपींवर संशय व्यक्त केला असल्याचे म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास सपोनि हजारे करीत आहेत.