सातारा : व्याजाच्या पैशावरून खासगी सावकाराने एकाचे अपहरण करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सातारा तालुक्यातील करंडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी खासगी सावकराला अटक केली आहे.ज्ञानदेव आनंदराव गोडसे (वय ५४, रा. खिंडवाडी, ता. सातारा) असे खासगी सावकराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दीपक सुभानराव जाधव (वय ५०, रा.करंडी, ता. सातारा) यांनी गोडसेकडून १० लाख ४० हजार रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. त्यापोटी व्याज व मुद्दल असे मिळून जाधव यांनी गोडसेला ३१ लाख २० हजार रुपये परत केले. मात्र, तरीही संशयित पैशाची मागणी करत असल्याने जाधव यांनी आणखी पैसे देण्यास नकार दिला.
त्याचा राग आल्याने ५ जून रोजी गोडसेने सकाळी सहा वाजता करंडी येथे जाऊन जाधव यांचे अपहरण केले व त्यांना घरातून जबरदस्तीने जीपमधून घेऊन गेले. त्यानंतर गोडसे याने जाधव यांना एमआयडीसी, सदरबझार, बीएसएनएल वसाहत, शेंद्रे, शिवाजीनगर, शेरेवाडी येथे धमकी देत फिरवले. यावेळी गोडसे याने जाधव यांच्या आई व भाऊ यांना देखील फोन करुन शिवीगाळ, दमदाटी करत धमकावले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
गोडसेच्या दहशतीला कंटाळून दीपक जाधव यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचे गंभीर स्वरुप पाहून पोलिसांनी तत्काळ खासगी सावकार ज्ञानदेव गोडसे याला अटक केली. दरम्यान, शुक्रवारी दुपारी गोडसे याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.