अबब... ‘आधार’ला बोली शंभराची!
By Admin | Published: July 8, 2015 10:06 PM2015-07-08T22:06:40+5:302015-07-08T22:06:40+5:30
प्रशासनाची डोळेझाक : शहरातील विविध केंद्रांवर बिनदिक्कत उकळले जातायेत पैसे
सातारा : एक रुपयाही न घेता मोफत आधार कार्ड देण्याची घोषणा करणाऱ्या प्रशासनाने डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे. शहरातील जवळपास सर्वच केंद्रांवर शंभर ते दोनशे रुपये उकळले जात आहेत. रोज सुमारे शंभर व्यक्तींनी आधार कार्ड काढले तर दहा हजार रुपये रोजचे त्यांना मिळत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांची लूट होत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याकडे कानाडोळा होत आहे.
आधार कार्ड आणि मतदान कार्ड संलग्न करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर सगळीकडेच आधार कार्ड काढण्यासाठी नागरिकांची एकच धावपळ उडालीय. तर शाळेतील लहान मुलांनाही आता आधार कार्ड सक्तीचे केल्यामुळे शहरातील विविध केंद्रांवर ठिकठिकाणी रांगा लागल्या आहेत.
आधार कार्डसाठी एक रुपयाही खर्च नसताना नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. यापार्श्वभूमीवर बुधवारी ‘लोकमत टीम’ने शहरातील विविध आधार कार्ड केंद्रांवर जाऊन माहिती घेतली असता एका व्यक्तीकडून शंभर रुपये घेतले जात असल्याचे निदर्शनास आले. येथील जिल्हा परिषदेच्यासमोर ग्राहक सेवा केंद्र आहे. या केंद्रामध्ये प्रत्येक व्यक्तीकडून शंभर रुपये घेतले जात होते. सुमारे एका तासामध्ये १५ ते १७ लोकांनी आधार कार्ड या केंद्रातून काढून घेतले. बाहेर आलेल्या प्रत्येकाकडे चौकशी केल्यानंतर आम्ही शंभर रुपये दिले असल्याचे त्यांनी सांगितले. काहीजण कोरेगाव, परळी, भुर्इंज येथून आधार कार्ड काढण्यासाठी आले होते. विशेष म्हणजे, यातील अनेक लोकांना आधार कार्ड काढण्यासाठी पैसे लागत नाहीत, हे माहिती होते. असे असतानाही त्या लोकांनी पैसे दिले. हे माहिती असतानाही मग पैसे का दिले, असे त्यांना विचारले असता आम्ही लांबून आलो आहोत. पैसे दिले नसते तर कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून आम्हाला घरी परत पाठविले असते. हेलपाटा नको म्हणून शंभर रुपये दिले, असे त्यांनी सांगितले.
नागरिकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात लूट होत असताना यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी गप्प का, याचे कोडे न उलगडणारे आहे. (प्रतिनिधी)
...तर परवाना रद्द करू
शहरातील बहुतांश आधार कार्ड केंद्रांवर शंभर ते दोनशे रुपये घेतले जात असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक विपीन सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी ते म्हणाले, ‘आधार कार्डसाठी काढून घेण्यासाठी एक रुपयाही खर्च नसतो. नागरिकांना मोफत ही कार्ड काढून दिली जात आहेत. संबंधितांचा परवाना रद्द केला जाईल.’
गेल्या अनेक महिन्यांपासून आधार कार्ड केंद्रावर नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत. आत्तापर्यंत लाखो रुपये लाटण्यात आले आहेत. या पैशाचे नेमके झाले काय, तसेच यामध्ये साखळी असण्याची शक्यता व्यक्त होत असून प्रशासनाने याची चौकशी लावावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
आम्ही खास आधार कार्ड काढण्यासाठी साताऱ्यात आलो आहोत. माझ्या पत्नीचे आणि मुलाचे आधार कार्ड काढायचे होते. जिल्हा परिषदेसमोरील वरद ग्राहक सेवा केंद्रामध्ये दोन आधार कार्ड काढली. या ठिकाणी माझ्याकडून दोघांचे मिळून दोनशे रुपये घेतले. शासनाकडून हे मोफत असताना सर्वसामान्यांची लूट केली जात आहे.
-नितीन जगदाळे, कुमठे, ता. कोरेगाव