दारुवाल्यांना दणका : २६ गुन्ह्यात २८ आरोपींना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
कराड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या चोरट्या दारुविक्रीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाच्या कराड कार्यालयाने दोन महिने धडक कारवाई करून तब्बल २६ गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये २८ आरोपींना अटक करण्यात आली असून, सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उत्पादन शुल्कचे निरीक्षक आर. एस. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अवैध दारू वाहतूक व विक्री यावर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार यांच्या मार्गदर्शनानुसार व अधीक्षक अनिल चासकर यांच्या सूचनेनुसार कऱ्हाड विभागात मार्च व एप्रिल महिन्यात कारवाईची मोहीम राबविण्यात आली. या कालावधीत मुंबई दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत कारवाई करून त्या अंतर्गत २६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये एकूण २८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ३०८ लिटर देशी दारू व १५४ लिटर ताडी तसेच नऊ दुचाकी व एक तीन चाकी रिक्षाही उत्पादन शुल्कने जप्त केली आहे. ५ लाख ८३ हजार ५४४ रुपये किमतीचा मुद्देमाल या कारवाई अंतर्गत जप्त करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर. एस. पाटील, दुय्यम निरीक्षक एस. बी. जंगम, आर. एस. खंडागळे, तसेच सहायक दुय्यम निरीक्षक एस. टी. बावकर, जवान व्ही. व्ही. बनसोडे, एस. आर. बक्केवाड, जे. एस. माने, बी. एस. माळी यांनी ही कारवाई केली. लॉकडाऊन कालावधीतही ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे निरीक्षक पाटील यांनी सांगितले.