कोरोना संक्रमणाचा वेग वाढल्यामुळे कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा असणाऱ्या किराणा व भाजीपाल्याची दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, विक्रेत्यांना सकाळी ११ वाजेपर्यंत घरपोच सेवा देण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यासाठीही परवानगीची आवश्यकता आहे. मात्र, कऱ्हाडात पालिकेची परवानगी न घेता घरपोच भाजी विकताना आठ विक्रेते आढळून आले. पालिका कर्मचा-यांनी संबंधित विक्रेत्यांकडील भाजीपाला जप्त केला. पालिकेने आजअखेर ८० भाजी विक्रेत्यांची कोरोना चाचणी केली आहे. त्यामध्ये चार जण बाधित आढळले आहेत. यापूर्वी किराणा दुकानदारांची चाचणी करण्यात आली होती. त्यामध्येही काही जण बाधित आढळले. त्यामुळे किराणा व भाजीपाला घरपोच विक्री करण्यापूर्वी विक्रेत्यासह त्याच्याकडे असलेल्या कामगाराची चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. चाचणी निगेटिव्ह प्राप्त झाली तरच संबंधिताला घरपोच विक्री सेवेसाठी आवश्यक असणारा पास मिळणार आहे. मात्र, काही जण चाचणी न करता आणि पास न घेता किराणा तसेच भाजीपाला घरपोच विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे पालिकेने याबाबत कठोर भूमिका घेतली असून चाचणी न करता आणि पास न घेता कोणी घरपोच विक्री करीत असेल तर संबंधितावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनीही विक्रेत्याकडे पालिकेचा पास असल्याशिवाय भाजी तसेच किराणा घेऊ नये, असे आवाहनही पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
विनापास घरपोच सेवा दिल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:41 AM