लोणंद : लोणंदमधील वाहतुकीच्या कोंडीमुळे लोणंदमधील जनता त्रस्त झाली असून वारंवार होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे लोणंदमधील जनतेचे हाल होत आहेत. या समस्येतून मार्ग काढण्यात यावा, अशी मागणी लोणंदमधील जनतेतून होत आहे. लोणंदमधून पुणे, सातारा, शिरवळ, खंडाळा अशी चारी बाजूने रहदारीची वाहतूक जास्त प्रमाणात होत असते. त्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर लावण्यात येणाऱ्या दोन चाकी, चार चाकी वाहने, अस्तव्यस्त लावलेली असतात. याकडे व्यापारी आपल्या हव्यासापोटी पूर्णपणे दुर्लक्ष करतात. परिणामी याचा त्रास पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. शाळेतील मुला-मुलींना याचा त्रास होत आहे. अशा विस्कळीत झालेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. लोणंद-खंडाळा व लोणंद-सातारा या वाटेवार वाहतुकीची सातत्याने कोंडी होत असते. तसेच आठवडा बाजारात रस्त्याच्या दुतर्फा मार्गावर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होऊन बाजार करणाऱ्या ग्राहकांना देखील या त्रासाला सामोरे जावे लागते. वाहतुकीच्या कोंडीमुळे होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून चोऱ्यामाऱ्यांच्या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत परिसर व बाजारतळ येथे सडकसख्या हरींचा त्रास होत आहे. तसेच लोणंदमधून जाणाऱ्या पुणे सातारा मार्गावर अवजड वाहनांची सारखी ये-जा असते. त्यामुळे पुणे-सातारा रस्त्यावर मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन चाकी कुठेही अस्ताव्यस्त लावलेल्या असतात. रस्त्याच्या बाजूला लावलेले व्यवसायिकांचे फलक रस्त्यामध्येच आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते. रस्त्याला ट्रॅफिक न होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, लोणंद ग्रामपंचायत लोणंद, वीज वितरण कंपनी, महसूल लोकप्रतिनिधी, खोकधारक, व्यापारी यांनी एकत्र येण्याची गरज आहे. म्हणजे वाहतूक कोंडीला आळा बसेल. सम-विषम तारेखस पार्किंग व्हावे. यामुळे ट्रॅफिक जामला आळा बसेल, अशी मागणी लोणंदमधील नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)
लोणंदच्या वाहतुकीला बेशिस्तीची लागण
By admin | Published: July 05, 2015 1:10 AM