सातारा : राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो असे म्हटले जाते. याचा प्रत्यय गुरूवारीच सातारकरांना आला. कारण, राजघराण्यातील उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे एकत्र आल्यानंतर हेच मनोमिलनाचं वारं पाटणच्या पाटलकांकडेही वळल्याचं दिसून आलं. राजघराण्यातील दोन भावांबरोबरच नरेंद्र पाटील आणि रमेश पाटील यांनीही छायाचित्रकारांना एकत्र पोझ दिली आणि यातून ‘आॅल इज वेल’चा संदेश आपसुकच बाहेर पडला.
लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचे उदयनराजे व शिवसेनेचे उमेदवार असणारे नरेंद्र पाटील यांच्यात लढत झाली. त्या निवडणुकीत परस्परांवर टोकाची टिकाही करण्यात आली होती. त्यापूर्वी राष्ट्रवादीत असणारे शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि भाजपात राहिलेले नरेंद्र पाटील यांच्या एकत्रित मिसळ खाण्याने अनेकांच्या भुवया ही उंचावलेल्या. मिसळ खातानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ठसकेबाज विश्लेषणही केलं होतं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे कोणाचं काम करणार आणि कोणाचं काम काढणार यावरही चर्चाही रंगलेली.
दरम्यान, नरेंद्र पाटील यांचे बंधू रमेश पाटील राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. सख्ख्या भावाच्या विरोधात जावून त्यांनी हाती असलेल्या घड्याळाचे लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले होते. हे काम करताना त्यांनी स्वत:च्या भावावरही आरोप केले होते. आता ते एकत्र येताना दिसून आले.दोन्ही भावाभावांमध्ये राजकीय वितुष्ट!नरेंद्र पाटील आणि रमेश पाटील यांच्यात राजकीय कारणावरून विसंवाद निर्माण झाला होता. हीच परिस्थिती साताऱ्यातही होती. तीन वर्षांपूर्वी सातारा पालिका निवडणुकीत मनोमिलनाची चुल मोडून सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी यांच्यात लढत झाली. यात उदयनराजेंच्या गटाने नविआच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची पत्नी वेदांतिकाराजेंचा पराभव केला होता.पूर्वीचे पक्के विरोधक आता झाले सख्खे प्रचारक!राष्ट्रवादीच्यावतीने उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांच्या विरोधात एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणूक लढवली होती. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणूकीत नरेंद्र पाटील यांनी तोडीस तोड प्रचार यंत्रणा कार्यान्वित करून जिल्ह्यात भयमुक्त वातावरणाची साद दिली. या सादला सातारकरांनी मतदानाच्या रूपात सकारात्मक प्रतिसादही दिला.आता अवघ्या चार महिन्यानंतर साताºयाच्या राजकीय पटलावर मोठी उलथापालथ झाली आहे. विकासाचा मुद्दा पुढं करून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कमळमार्ग स्विकारल्यानंतर लगेचच लोकसभेचा राजीनामा देत उदयनराजे यांनीही कमळाला जवळ केलं. दोन्ही राजे आता एकाच पक्षात आहेत. पूर्वीचे पक्के विरोधक आता सख्खे प्रचारक झाले आहेत.
सातारा येथे गुरूवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह नरेंद्र पाटील आणि रमेश पाटील असे एकत्र आले.