चार पिढ्यांनंतर कोळेकरवाडीस मिळणार रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:40 AM2021-05-12T04:40:31+5:302021-05-12T04:40:31+5:30

चाफळ : अनेक पिढ्या डोंगर खालीवर करून अक्षरक्ष: झिजून मेल्या. आज रस्ता होईल उद्या रस्ता होईल या आशेवर जगणाऱ्या ...

After four generations, Kolekarwadi will get a road | चार पिढ्यांनंतर कोळेकरवाडीस मिळणार रस्ता

चार पिढ्यांनंतर कोळेकरवाडीस मिळणार रस्ता

Next

चाफळ : अनेक पिढ्या डोंगर खालीवर करून अक्षरक्ष: झिजून मेल्या. आज रस्ता होईल उद्या रस्ता होईल या आशेवर जगणाऱ्या कोळेकरवाडीकरांचे रस्त्याचे स्वप्न अखेर सत्यात उतरू पाहत आहे. कोळेकरवाडी गावापर्यंत कडेकपारी फोडून रस्ता गावापर्यंत पोहोचविण्यासाठी तीस लाखांचा निधी मजूंर झाला आहे. त्यामुळे कोळेकरवाडीतील ग्रामस्थांतून आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

कोळेकरवाडी (ता.पाटण ) हे गाव डेरवण ग्रामपंचायती अंतर्गत मोडते. चाफळ विभागातील डोंगरी व दुर्गम विभागात वसलेले हे एक छोटस गाव आहे. स्वातंत्र्यानंतर येथील ग्रामस्थ रस्त्याच्या शोधात होते. अत्यावश्यक काम असो की गुरुवारचा चाफळला भरणारा आठवडी बाजार असो. पायी चालत डोंगरातून वाट शोधत तीन ते चार किलोमीटर पायपीट करावी लागते. डोक्यावर बाजार घेऊन तेवढंच अंतर पुन्हा डोंगर चढून जायचे हा येथील ग्रामस्थांचा नित्यनेमाने एक सवयीचा भागच झालेला. कधी आपल्या गावाला रस्ता होईल ही आशाही धूसर बनली होती. येथील एक पिढी वार्धक्याकडे तर एक पिढी रस्त्याची आस घेऊन जीवन जगत होती. निवडणुका आल्या की फक्त आश्वासन मिळण्यापलीकडे काहीच मिळालं नाही. आपल्या गावाचा रस्त्याचा प्रश्न नक्कीच कोणीतरी सोडवेल या अपेक्षेने गावातील संभाजी कोळेकर, हणमंत कोळेकर, नारायण डिगे यांच्यासह गावातील तरुण व ज्येष्ठ ग्रामस्थ आमदार देसाई यांच्याकडे पाठपुरावा केला होता, पण रस्त्याच्या दुतर्फा वनविभाग असल्याने रस्त्याच्या कामासाठी मोठी अडचण निर्माण झाली. पण अडचणी पुढे हार मानणारे कोळेकरवाडीचे ग्रामस्थ नव्हते. आपल्याला रस्त्याअभावी जे भोगावे लागले ते येणाऱ्या पिढीच्या नशिबी नसावं या उदात्त हेतूने रस्ता मंजूर होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वनविभागातून जाणाऱ्या रस्त्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी कागदपत्रांचा पाठपुरावा सुरू केला. अनेक अडचणी आल्या तरी त्यावर मात करत प्रयत्न सुरू केलेे. अखेर वनविभागाकडून परवानगी मिळाली. लागलीच नामदार शंभूराज देसाई यांनी कोळेकरवाडी रस्त्याच्या कामासाठी मूलभूत सुविधा पुरविणे (२५१५-१२३८ ) अतंर्गत ३० लाख रुपयांचा पहिला निधी मंजूर केला असून नुकताच या रस्त्याचा सर्व्हे करण्यात आला. संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष भरत साळुंखे, शिवदौलतचे संचालक चंद्रकांत पाटील, इरफान मुल्ला व बांधकाम विभागाचे ए. एम. जाधव यावेळी उपस्थित होते.

चौकट

कोळेकरवाडी रस्त्याचे काम खूप अडचणीचे होते. पहिल्यापासून गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी कोळेकरवाडी रस्ता पूर्ण करणारच असे ठामपणे सांगितले होते. आज ३० लाखाचा निधी मंजूर झाल्याने आम्ही सर्व ग्रामस्थ खूप आनंदी आहोत.

Web Title: After four generations, Kolekarwadi will get a road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.