पुसेसावळी : विटा-महाबळेश्वर राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु चोराडे येथील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेली गटारे बंदिस्त करण्यात आली नाही. या गटावरील लोखंडी सळ्या धोक्याची घंटा देत असून, याबाबत तातडीने उपायोजना करणे गरजेचे आहे.कोरोनाचा पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे अनेक विकासकामे ठप्प होती. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सर्व उद्योग, व्यवसाय, बांधकामे टप्प्याटप्प्याने सुरू झाली. विटा-महाबळेश्वर या राज्यमार्गाचे कामही पुन्हा सुरू झाले. मात्र, कंत्राटदाराकडून काही कामे तशीच अर्धवट सोडण्यात आली आहे.राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूला गटारांचे बांधकाम करण्यात आले आहे. चोराडेसह ठिकठिकाणी ही गटारे बंदिस्त करण्यात आली नाहीत. त्यामुळे बांधकामासाठी वापरलेल्या लोखंडी सळ्या धोक्याची घंटा देत उभ्या आहेत. रस्ता चांगला झाल्यामुळे या मार्गावर वाहनाची संख्या देखील वाढली आहे. शिवाय लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे. एखादी विपरित घटना घडण्यापूर्वी कंत्राटदाराने रस्त्याच्या दुतर्फा असलेली गटारे बंदिस्त करावी, अशी मागणी चोराडे ग्रामस्थांमधून होत आहे.मुख्य रस्त्याला जोडलेले अंतर्गत मार्गही उंच गटारांमुळे निरुपयोगी झाले आहेत. या गटारांची उंची कमी न केल्याने हे मार्ग वाहतुकीस अडचणीचे ठत आहेत. ही समस्या गंभीर असून, प्रशासनाने तातडीने उपायोजना करावी, अशी मागणीही ग्रामस्थांसह वाहनधारकांमधून होत आहे.
चोराडेतील गटारे उघडी आहेत. या गटरांमध्ये ठिकठिकाणी मुरुम पडलेला आहे. त्यामुळे गटरात पाणी साचून राहत आहे. ही गटारे बंदिस्त करून वाहनधारकांना दिलासा द्यावा.-श्रीकांत पिसाळ, चोराडे