जिल्ह्यात आता सर्व दुकाने सुरु राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:33 AM2021-07-25T04:33:07+5:302021-07-25T04:33:07+5:30
सातारा : सातारा जिल्ह्यातील आरटीपीसीआर तपासणीतील रुग्णवाढ कमी झाल्याने सातारा जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ...
सातारा : सातारा जिल्ह्यातील आरटीपीसीआर तपासणीतील रुग्णवाढ कमी झाल्याने सातारा जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी काढले. हे आदेश २६ जुलैपासून ते पुढील आदेश होईपर्यंत लागू करण्यात आलेले आहेत.
सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वानुसार, सातारा जिल्ह्यामध्ये आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी ५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी ५ वाजल्यापासून ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संचारबंदीच्या वेळेत वैध कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीला संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अत्यावश्यक बाबीची दुकाने, आस्थापना या आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल. मात्र, औषधांची दुकाने सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत चालू राहतील. तथापि, हॉस्पिटलमधील औषधांची दुकाने पूर्णवेळ सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकान, आस्थापना या सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल.
सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ४ या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंट यांना आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी असेल. तसेच आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत घरपोच पार्सल सेवा सुरु ठेवण्यास परवानगी असेल. लॉजिंग, बोर्डींग सुरु ठेवण्यास परवानगी असेल. ज्या हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये लॉजिंग सुविधा उपलब्ध आहे, अशा हॉटेल व रेस्टॉरंट चालकांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ या कालावधीमध्ये आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने हॉटेल, रेस्टॉरंट सुरु ठेवण्यास परवानगी असेल. सार्वजनिक जागा, खुली मैदाने, चालणे, सायकल चालविणे यासाठी आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी ५ ते ९ यावेळेत परवानगी असेल. खुल्या जागेतील क्रीडाविषयक बाबी या आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी ५ ते ९ यावेळेत सुरु ठेवण्यास परवानगी असेल. मात्र, कोणत्याही क्रीडासंबंधी स्पर्धा आयोजित करण्यास मनाई असेल.
चित्रीकरण - आयसोलेशन बबलमध्येच चित्रीकरण व वास्तव्य करणे बंधनकारक राहील. कोणतेही गर्दीचे व गर्दी होईल, असे चित्रीकरण करता येणार नाही. तसेच आयसोलेशेन बबलच्या बाहेर सायंकाळी ५ नंतर कोणालाही संचार, प्रवास करता येणार नाही. लग्न समारंभ दोन तासांपेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीत २५ लोकांच्या (संपूर्ण कार्यक्रमासाठी भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी/वाढपी इ.सह) मर्यादेत लग्न आयोजन करण्याकामी संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.
सर्व बांधकामांना परवानगी असेल. ज्या मजुरांची राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी असेल, त्यांनी बांधकाम करण्यास हरकत नाही. तथापि, ज्या मजुरांची राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी नसेल, अशा मजुरांनी सायंकाळी ४ वाजेपर्यंत बांधकामाचे ठिकाण सोडावे. शेतकऱ्यांना आवश्यक असणारे बियाणे, खते, शेतीविषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवांची दुकाने आठवड्याचे सर्व दिवशी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल.
हे पूर्णत: बंदच राहणार...
सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक प्रार्थनास्थळे, करमणूक कार्यक्रम, मेळावे, व्यायामशाळा, स्पा, वेलनेस सेंटर, मॉल, सिनेमागृहे (एक किंवा अनेक पडदी)/ नाटयगृहे आदी पूर्णपणे बंद राहतील.
बाजार समित्यांमध्ये सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत व्यवहार
सातारा जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील. बाजार समित्यांच्या ठिकाणी फक्त घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांनाच तेथे जाऊन माल घेता येईल, कोणत्याही वैयक्तिक व्यक्तीला बाजार समितीच्या ठिकाणी प्रवेश नसेल, या शर्तीसह समित्या सुरु राहतील.