वन कर्मचाऱ्याचे पुष्पप्रेम उलगडले कास पठारावर!
By admin | Published: October 4, 2015 09:42 PM2015-10-04T21:42:11+5:302015-10-05T00:18:24+5:30
आठ वर्षे अभ्यास : श्रीरंग शिंदे यांच्या पुस्तकाचे वनसचिवांच्या हस्ते प्रकाशन; जैवविविधतेची माहिती
पेट्री : कास पठारावरील पुष्पवैभवावर सचित्र पुस्तक प्रसिद्ध करण्याचा मोह अनेक निसर्गप्रेमींना होतो; परंतु वन कर्मचाऱ्यानेच असे पुस्तक लिहिण्याची घटना पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच घडली आहे. बामणोलीचे वनपाल श्रीरंग शिंदे यांनी पठाराविषयी दोन पुस्तके लिहिली असून, वनसचिव विकास खारगे यांच्या हस्ते कास पठारावरच रविवारी त्यांचे प्रकाशन करण्यात आले.
अनेक वनस्पतितज्ज्ञांनी कास पठारावरील समृद्ध जैवविविधतेचा अभ्यास करून पुस्तके लिहिली आहेत. परंतु कास पठाराचे व्यवस्थापन करणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्याने पुस्तक लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. श्रीरंग शिंदे हे बामणोली विभागाचे वनपाल म्हणून कार्यरत असून, पठारावरील वनस्पतींची, त्यांच्या गुणधर्मांची, फुलण्याच्या दिवसांची त्यांना माहिती आहे. कास पठारावर पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी आतापर्यंत त्यांनी दहा गाइड तयार केले आहेत. त्यांनी लिहिलेल्या मोठ्या पुस्तकात शंभर वनस्पतींची माहिती असून, पन्नास वनस्पतींची माहिती असणारी छोटी आवृत्तीही रविवारी शेकडो पर्यटकांच्या साक्षीने पठारावरच प्रकाशित करण्यात आली.
राज्याचे वनसचिव विकास खारगे यांच्या हस्ते झालेल्या या अनौपचारिक प्रकाशन समारंभास कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. के. राव, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, सहायक वनसंरक्षक महादेव मोहिते यांच्यासह दीपक खाडे, तानाजी गायकवाड आणि वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. वनसचिव खारगे यांनी कर्मचारी आणि पर्यटकांशी संवाद साधला. आठ वर्षांपासून सुरू असलेल्या अभ्यासाचे फलित म्हणजे हे पुस्तक असून, कास पठारावरील जैवविविधतेची संपूर्ण माहिती या पुस्तकात लिहिली आहे. पर्यटकांना वस्तुनिष्ठ माहिती मिळेल, असे शिंदे यांनी सांगितले.
कास पठारावर कचरा दिसत नसल्याने वनसचिवांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. कासाणी-आटाळी गावांदरम्यान वाहनांच्या पार्किंगची उत्तम सोय झाली तर पठारावर वाहतुकीची कोंडी होणार नाही, असे खारगे यांनी सांगितले. शिंदे यांचे पुस्तक माहितीसाठी सर्व वनपाल, वनरक्षकांना पोहोच करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या अनौपचारिक कार्यक्रमास पर्यटकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)
तीन दिवसांत
१३ हजार पर्यटक
शुक्रवार ते रविवार जोडून सुट्या आल्याने पठारावर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. या तीन दिवसांत सुमारे १३ हजार पर्यटकांनी पठाराला भेट दिल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावर्षी एकंदर एक लाखांहून अधिक पर्यटक पठारावर आले असून, शुल्कवसुली २० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. २०११ पासूनची ही सर्वाधिक शुल्कवसुली आहे.